डरबन : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान वन डे मालिकेला उद्या (गुरुवार)पासून सुरुवात होणार आहे. सहा वन डे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना डरबनच्या किंग्जमेड मैदानावर खेळवण्यात येणार आहे. मात्र डरबनचा इतिहास पाहता कर्णधार विराट कोहलीला घाम फुटण्याची शक्यता आहे.
कसोटी मालिकेत टीम इंडियाला 2-1 अशा पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे वन डे मालिकेत विराट कोहलीच्या टीम इंडियाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा राहील. सध्या वन डे क्रमवारीत दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानावर असून टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे.
डरबनचा इतिहास
ज्या डरबनमध्ये भारत दक्षिण आफ्रिकेला भिडणार आहे, तिथे आतापर्यंत टीम इंडियाने एकही वडे सामना जिंकलेला नाही. 1992-93 पासून यजमान संघासोबत झालेले सातपैकी सहा वनडे सामने आतापर्यंत भारताने गमावले आहेत, तर एक सामना अनिर्णित राहिला.
डरबनमध्ये टीम इंडियाचा हा दहावा सामना आहेत. 2003 च्या विश्वचषकात इंग्लंड आणि केनियाविरुद्ध प्रत्येकी एक सामना भारताने खेळला आहे. दोन्ही सामन्यांमध्ये भारत जिंकला आहे, मात्र यजमान संघाकडून पराभव स्वीकारण्याची मालिका आहे. अर्थात, ती मालिका तोडण्याची संधी विराट ब्रिगेडकडे आहे.
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत एकही दुरंगी एकदिवसीय मालिका जिंकलेली नाही. द.आफ्रिकेत भारताने सहा मालिका खेळल्या असून सर्वच्या सर्व मालिकांमध्ये भारत पराभूत झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाने एकूण 28 वनडे सामने खेळले आहेत, त्यापैकी फक्त पाच सामन्यांमध्ये भारत जिंकला. 21 सामन्यांमध्ये टीम इंडिया हरली असून 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. 18 जानेवारी 2011 रोजी द.आफ्रिकेत भारताने शेवटची वनडे जिंकली होती.
दक्षिण आफ्रिकेचं पिच आणि त्यांच्या संघातील गोलंदाजांचा सामना करताना भारताच्या नाकी नऊ येत असल्याचं म्हटलं जातं.
डरबनचं पिच कसं आहे?
डरबनचं पिच फलंदाजांची झोप उडवू शकतं. पिचवरील गवतामुळे वेगवान गोलंदाजांचं नशिब फळफळलं आहे. डरबनमधील पिच वेगवान आणि उसळी मारणारं असेल, असा अंदाज आहे.
डरबनमध्ये 250 धावा विजयाचा आकडा ठरु शकतात. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होऊ शकतो. मात्र यावेळी डे-नाईट मॅच असल्यामुळे दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघालाही लाभ होण्याची शक्यता आहे. भारतीय फलंदाजांनी जोर लावला, तरच इथे विजय खेचून आणता येईल.