मुंबई : विराट कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचं नेतृत्त्व रोहित शर्माच्या खांद्यावर आहे. इंदूर टी-20 सामन्यात रोहित शर्माने कर्णधारपदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळत, अनेक विक्रमही नोंदवले. टी-20 च्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याच्या शर्यतीत रोहितने दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरची बरोबरी केली आहे.

रोहित शर्माने स्वत: 118 धावांची दमदार खेळी करत श्रीलंकेविरोधात भारतीय संघाला 80 धावांनी विजय मिळवून दिला आणि 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेवरही विजयी आघाडी मिळवली.

रोहितने शुक्रवारी इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये श्रीलंकेविरोधात 43 चेंडूत 118 धावांची खेळी केली. यावेळी रोहितने शतक 35 चेंडूत पूर्ण केले. 10 षटकार आणि 12 चौकारांचा समावेश रोहितच्या 118 धावांच्या खेळीत आहे.

इंदूरमधील सामन्यात 10 षटकार ठोकून रोहितने 2017 वर्षात सर्वाधिक षटकार ठोकण्याची नोंदही केली आहे.

2017 या वर्षात आतापर्यंत रोहितने 64 षटकार लगावले असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यंदा एवढे षटकार कोणत्याच खेळाडूच्या नावावर नाहीत. षटकारांचा विक्रम याआधी दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्सच्या नावावर होतं. डिव्हिलियर्सने 2015 या वर्षात 63 षटकार लगावले होते.

आता या यादीत पहिल्या स्थानवर रोहित, दुसऱ्या स्थानवर डिव्हिलियर्स आणि तिसऱ्या स्थानावर ख्रिस गेल असेल. कारण गेलने 2012 या वर्षात 59 षटकार लगावले होते.