मुंबई : दैनंदिन कामकाजात व्यस्त असणाऱ्या मुंबई हायकोर्टातील सर्व न्यायमूर्तींसह जेष्ठ वकिलांनीही शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटला. एरव्ही कोर्टात एकमेकांशी हुज्जत घालणाऱ्या या सर्व रथी महारथींना मैदानात खेळताना पाहण्याचा योग मिळाला. या सामन्यात वकिलांच्या संघाने न्यायमूर्तींच्या संघावर मात केली.

एरव्ही काळ्या कोटात टापटीप राहणारे हायकोर्टाचे न्यायमूर्ती वानखेडे स्टेडियमवर पायाला पॅड, हातात ग्लोव्हज आणि बॅट घेऊन क्रिकेटचा मनसोक्त आनंद लुटत होते. या मैत्रिपूर्ण सामन्यात हायकोर्टातील वकिलांनी अखेरीस न्यायमूर्तींविरोधातील पराभवाचा आपला दुष्काळ संपवला.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शनिवारी रंगलेल्या सामन्यात वरिष्ठ वकीलांच्या संघाने न्यायमूर्तींच्या संघावर 28 धावांनी मात करत अरविंद बोबडे स्मृतीचषकावर आपलं नाव कोरलं. टी-20 च्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वकिलांच्या संघाने 135 धावांची मजल मारली. ज्याचा पाठलाग करताना न्यायमूर्तींचा संघ 106 धावांत गडगडला.

या सामन्यात सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती बोबडे यांनी 23 धावा करून सर्वोत्तम फलंदाजाचा किताब मिळवला. तर मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती आर. एम. सावंत यांनी 3 विकेट्स घेत सर्वोत्तम गोलंदाजाचा किताब मिळवला. तर अष्टपैलू कामगिरी करून वकिलांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या जेष्ठ कायदेतज्ञ प्रसाद ढाके-फाळकर यांनी सर्वोत्तम खेळाडूच्या किताबाने गौरवण्यात आलं.

वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्याकरता मुंबई हायकोर्टाच्या प्रभारी मुख्य न्यायाधीश विजया कापसे-तहिलरमानी याही उपस्थित होत्या. तर न्यायमूर्ती नरेश पाटील, न्यायमूर्ती शंतनू केमकर, न्यायमूर्ती गवई, न्यायमूर्ती जामदार, न्यायमूर्ती अनिल मेनन, न्यायमूर्ती कर्णिक, वरिष्ठ वकिल जनक द्वारकादस, राज्याचे माजी महाधिवक्ता दरायस खंबाटा यांच्यासह इतर अनेकांनी प्रत्यक्ष मैदानावरील सामन्यात भाग घेतला होता.