नाशिक : तुम्ही जमिनीमध्ये गुंतवणूक करणार असाल तर जरा खबरदारी बाळगा... जमिनीचे कागदपत्र बघूनच गुंतवणूक करा.. नाहीतर तुमचीही फसवणूक होऊ शकते.. चक्क शिर्डी विमानतळाची जागा दाखवून उतर महाराष्ट्रातील असंख्य गुंतवणूकदारांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.


‘शिर्डी विमानतळाशेजारील जागा विकणे आहे’, ‘स्वस्त दरात प्लॉट विकत घेता येणार’ अशा जाहिराती देऊन गुंतवणूकदारांना आकर्षित केलं जातं. त्यामुळे असा जाहिरातील किंवा फलक पाहून तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण, असंच आमिष दखवून नाशिकच्या उमेश पोतदार यांची फसवणूक झाली आहे.

नाशकातल्या एका एजंटने त्यांना विमानतळाशेजारील जमिनीचे प्लॉट विकले. पोतदारांनी 2013-14 साली साडेतीन लाखांहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली. मात्र 4 वर्ष उलटून गेली, तरीही जमीन ताब्यात मिळाली नाही. उलट एक धक्कादायक तथ्य समोर आलं. ती जमीन विमानतळाच्या मालकीची निघाली.

फसवणूक झालेले पोतदार हे एकटेच नाहीत. नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील अनेकांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा भामट्यांना अटक केली आहे. शिवाय समोर येऊन तक्रार करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

भविष्याची तरतूद म्हणून प्रत्येक जण पदरमोड करत वर्तमानकाळात गुंतवणुकीला प्राधान्य देत असतो. मात्र गुंतवणूक करताना किती काळजी घेतली पाहिजे, ते या उदाहरणातून समोर आलं आहे. त्यामुळे तुम्हीही गुंतवणूक करत असाल, तर आवश्यक ती खात्री करा आणि मगच पाऊल उचला.