कोलंबो : हरमनप्रीत कौरने अखेरच्या षटकातल्या पाचव्या चेंडूवर ठोकलेला षटकार भारताच्या दक्षिण आफ्रिकेवरच्या सनसनाटी विजयात निर्णायक ठरला. भारताने हा सामना एका विकेटने जिंकून, श्रीलंकतेल्या विश्वचषक पात्रता स्पर्धेचं विजेतेपदही पटकावलं.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला विजयासाठी 50 षटकांत 245 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला अखेरच्या दोन चेंडूंवर विजयासाठी आठ धावांची आवश्यकता होती. हरमनप्रीतने अखेरच्या षटकातल्या पाचव्या चेंडूवर षटकार ठोकून विजयाचं समीकरण एका चेंडूंत दोन धावांवर आणलं. मग अखेरच्या चेंडूवर दोन धावा घेऊन तिनं भारताला विजयासह विजेतेपदही मिळवून दिलं.
भारताकडून मोना मेश्रामने 59 धावांची, तर दिप्ती शर्माने 71 धावांची खेळी केली. त्याआधी, राजेश्वरी गायकवाडने तीन, तर शिखा पांडेने दोन विकेट्स घेऊन दक्षिण आफ्रिकेला 244 धावांत रोखलं.