चेन्नई : 'हार्दिकवर आम्हाला संपूर्ण विश्वास आहे. त्याच्या खेळीमुळेच सामना पलटला. त्याच्यामध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही गोष्टी आहेत. त्याच्यासारखा खेळाडू संघात असणं ही खरंच भाग्याची गोष्ट आहे.' अशा शब्दात कर्णधार विराट कोहलीनं सामनावीर हार्दिक पांड्याचं कौतुक केलं.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतानं 26 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 नं बढत घेतली आहे. या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना विराट कोहली म्हणाला की, 'हार्दिक पांड्या  हा या सामन्याचा खरा हिरो आहे.' हार्दिक पांड्यांच्या खेळीनंच सामन्याचा नूर पालटला असंही विराट म्हणाला.

यावेळी बोलताना विराट म्हणाला की, 'पांड्याच्या महत्त्वपूर्ण खेळीनं पहिल्या सामन्याचा रंगच पालटला. त्यानं पुन्हा एकदा सिद्ध केलं की, तो खालच्या क्रमांकावर शानदार फलंदाजी करु शकतो.'

'प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला तेव्हा आम्ही मोठी धावसंख्या उभारण्याचा निश्चय केला होता. पण आम्ही झटपट विकेट गमावल्यानं सुरुवातीलाच आमच्यावर दबाव आला. पण हार्दिक आणि धोनीनं शानदारपणे डाव संपवला. फलंदाजीसाठी मध्यम आणि शेवटचा क्रमांकही किती महत्त्वाचा असतो याचं हे उत्तम उदाहरण आहे.’ असं विराट यावेळी म्हणाला.

संबंधित बातम्या :

धोनीचा नवा विक्रम, अर्धशतकांचं शतक पूर्ण!

धडाकेबाज धोनीची नव्या विक्रमाला गवसणी  

दोन सिक्स मारले की तिसरा मारतोच, पांड्या आणि षटकारांची हॅटट्रिक!