Hardik Pandya Last over: टीम इंडियाने शनिवारी बार्बाडोसच्या मैदानावर झालेल्या रोमहर्षक लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा 7 धावांनी पराभव केला होता. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेसमोर (Ind vs SA) 177 धावांचे आव्हान ठेवले होते. त्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकन संघाने सुरुवातीच्या धक्क्यांनंतर सामन्यात पुनरागमन केले होते. क्विंटन डी-कॉक आणि हेनरिक क्लासेन या जोडगोळीने तुफान फटकेबाजी करत आफ्रिकेच्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले होते. मात्र, शेवटच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी चमत्कार केल्याने टीम इंडियाने साऊथ आफ्रिकेच्या तोंडातून विजयाचा घास हिरावला. या सगळ्यात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याची दोन षटके निर्णायक ठरली.


काही महिन्यांपूर्वी आयपीएल स्पर्धेत याच हार्दिक पांड्याला भरमैदानात प्रेक्षकांच्या हुटिंगचा सामना करावा लागला होता. मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद रोहित शर्माकडून काढून हार्दिकला देण्यात आले होते. त्यामुळे रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सचे समर्थक मैदानात दिसेल तिथे हार्दिक पांड्याविरोधात हुटिंग करत होते. सामना सुरु असताना हार्दिकला 'छपरी, छपरी' म्हणून प्रेक्षकांनी हैराण करुन सोडले होते. या सगळ्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी हार्दिकची छबी एखाद्या व्हिलनप्रमाणे झाली होती. 


15 व्या षटकात हेनरिक क्लासनने धावांची टाकसाळ उघडली अन्... 


रोहित शर्माने अक्षर पटेलला 15 वे षटक टाकण्यास सांगितले. यावेळी हेनरिक क्लासेन स्ट्राईकवर करत होता. त्याने पंधराव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूत चौकार लागवला. त्यानंतर अक्षरने सलग दोन चेंडू वाईट टाकले. परिणामी दक्षिण आफ्रिकेला मोफत दोन धावा मिळाल्या. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एकही धाव निघाली नाही. तिसऱ्याच चेंडूवर मात्र क्लासेने लांब पल्ल्याचा षटकार लगावला. त्यानंतर चौथ्या चेंडूवरही त्याने असाच षटकार मारत भारतीयांच्या आनंदावर विरजण टाकले. पाचव्या चेंडूवर क्लासेननेच जोराचा फटका मारत चौकार लागावला. शेवटच्या षटकात क्लासेनने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला पण यात तो यशस्वी झाला नाही. परिणामी या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेला दोन धावा मिळाल्या. म्हणजेच अक्षर पटेलच्या एका षटकात क्लासेनने 24 धावा कुटल्या. या एका षटकाने सामना पूर्णपणे आफ्रिकेच्या बाजूला झुकला होता. क्लासेनच्या फटकेबाजीमुळे दक्षिण आफ्रिकेसाठी 30 चेंडूत 30 धावा अशी सोपी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पुढच्या दोन षटकांत क्लासेन सामना संपवणार असे चित्र असतानाच हार्दिक पांड्याने कमाल करुन दाखवली.


हार्दिकने क्लासेनला माघारी धाडले अन् सामना फिरला


15व्या षटकात अक्षर पटेलच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवणारा क्लासेन 17 व्या षटकात हार्दिक पांड्यावरही हल्ला चढवणार, असे दिसत होते. मात्र, हार्दिकने पहिल्याच चेंडूवर हेनरिक क्लासेनला बाद केले. हार्दिक पांड्याने या षटकात केवळ 4 धावा दिल्या. इथेच दक्षिण आफ्रिकेवर पुन्हा दबाव निर्माण होऊ सामना फिरला. त्यानंतर शेवटच्या षटकातही हार्दिकने टिच्चून गोलंदाजी केली. 20 व्या षटकातही हार्दिकच्या पहिल्याच चेंडूवर धोकादायक मिलरने चेंडू सीमारेषेच्या दिशेने भिरकावला. मात्र, सुर्यकुमार यादवने अप्रतिम झेल टिपत आफ्रिकेच्या सर्व आशा धुळीस मिळवल्या. शेवटच्या षटकांमध्ये प्रचंड दबाव असताना हार्दिक पांड्याने थंड डोक्याने केलेल्या या गोलंदाजीमुळे भारताला विजय मिळू शकला.  


हार्दिक पांड्याने विश्वास सार्थ ठरवला


आयपीएलमधील अपयश, पत्नी नताशा स्टॅनकोविक सोबतच्या कथित घटस्फोटाच्या चर्चा यानंतरही रोहित शर्मानं हार्दिक पांड्यावर विश्वास टाकला. हार्दिकला उपकप्तान करण्यात आलं. हार्दिक लंडनला गेला तिथून तो अमेरिकेत पोहोचला. तोपर्यंत त्यानं कटू प्रसंगाच्या आठवणी मागं टाकल्या होत्या. बांगलादेश विरुद्धच्या मॅचपासून हार्दिकला सूर गवसलेला. मुख्य स्पर्धेत हार्दिकनं फलंदाजी करताना 144 धावा काढल्या. तर, गोलंदाजी करताना निर्णायक 11 विकेट घेत संघाला विजेतेपदाचा उंबरठा ओलांडण्यास मदत केली.


आणखी वाचा


भारत जिंकला अन् हार्दिकच्या डोळ्याला पाण्याची धार, मनात साचलेलं शल्य मोकळं केलं, म्हणाला, गेले सहा महिने....