चेन्नई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघानं दणदणीत विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली आहे. या पहिल्या सामन्याचा हिरो ठरला तो टीम इंडियाचा अष्टपैलू हार्दिक पांड्या. त्याच्या 83 धावांच्या खेळीनं भारताला मोठी धावसंख्या उभारता आली.
दरम्यान, या सामन्यातील विश्वसनीय खेळीसाठीच पांड्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. त्यावेळी बोलताना पांड्यानं या खेळीचं श्रेय महेंद्रसिंह धोनीला दिलं.
एवढ्या कठीण परिस्थितीत तू धोनीसोबत कशी फलंदाजी केली? या प्रश्नाला उत्तर देताना पांड्या म्हणाला की, 'ऑस्ट्रेलिया त्यावेळी मजबूत स्थितीत होती आणि आमच्यावर भरपूर दबाव होता. आम्ही बऱ्याच विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे एका भागीदारीची गरज होती. धोनी आणि मी एकमेकांशी चर्चा केली आणि परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला.'
पावसाच्या व्यत्ययानंतरही भारतीय संघानं ऑस्ट्रेलियावर 26 धावांनी मात केली. कर्णधार कोहलीनं या विजयाचं श्रेय पांड्यालाच दिलं. पण हार्दिक मात्र हे धोनीमुळेच शक्य झाल्याचं प्रांजळपणे कबूल केलं.
यावेळी पांड्यानं सांगितलं की, ‘मी धोनीच्या साथीनं रणनिती आखली आणि त्यानुसार खेळ केला.’ पांड्या फलंदाजी करत असताना धोनी जवळपास प्रत्येक चेंडू झाल्यानंतर पांड्याशी बोलत होता. त्याला काही टिप्सही तो देत होता.
'जेव्हा मी आणि माही भाई बॅटिंग करत होतो तेव्हा आम्ही आधी छोटे-छोटे टप्पे ठरवले. सुरुवातीला 230 पर्यंत स्कोअर नेण्याचा आमचा विचार होता. पण त्यानंतर स्कोअर 280च्या वर पोहचला. हीच आमच्यासाठी सकारात्मक गोष्ट ठरली. आम्ही ज्या परिस्थितीत ही धावसंख्या उभारली होती ते पाहून सर्वांनाच आनंद झाला. त्यामुळे आम्ही ऑस्ट्रेलियावर दबाव आणू शकलो.' असं पांड्यानं सांगितलं.
‘खेळपट्टीवर काही काळ घालवल्यानंतर मी मोठे फटके खेळणं गरजेचं होतं. तेव्हा मी तसे फटके मारले देखील.' असंही हार्दिक म्हणाला.
सामन्याच्या 37व्या षटकात हार्दिकनं अॅडम झॅम्पाला ओव्हरमध्ये एक चौकार आणि तीन षटकार ठोकले. या ओव्हरमध्ये त्यानं 24 धावा केल्या. याबाबत बोलताना हार्दिक म्हणाला की, 'माझ्यासोबत माही भाई होते आणि त्यांनी त्यावेळी मला अनेक गोष्टी समजावल्या.' असं म्हणत पांड्यानं या खेळीचं श्रेय धोनीला दिलं.
संबंधित बातम्या :
चेन्नई विमानतळावर टीम इंडिया रिलॅक्स मूडमध्ये!
हार्दिकसारखा खेळाडू संघात असणं ही भाग्याची गोष्ट : विराट
धोनीचा नवा विक्रम, अर्धशतकांचं शतक पूर्ण!
धडाकेबाज धोनीची नव्या विक्रमाला गवसणी
दोन सिक्स मारले की तिसरा मारतोच, पांड्या आणि षटकारांची हॅटट्रिक!