नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू (Hardik Pandya Krunal Pandya ) हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याचे वडील हिमांशु पांड्या यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनानं पांड्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्या हे वृत्त मिळालं, त्यावेळी सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेसाठी गेला होता. वडिलांच्या निधनाचं वृत्त कळताच त्यानं कशाचीही तमा न बाळगता वडोदरा संघाचे बायो बबलचे नियम मोडत घराच्या दिशेनं धाव घेतली. परिणामी आता कृणाल पांड्या या स्पर्धेतील उर्वरित सामन्यांमध्ये दिसणार नाही आहे.
वडोदरा क्रिकेट असोसिएशनच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एएनआयशी संवाद साधताना याबाबतची माहिती दिली. ज्यामध्ये त्यांनी कृणाल पांड्या तातडीनं खासगी कारणासाठी बायो बबल सोडून घराच्या दिशेनं रवानं व्हावं लागल्याचं स्पष्ट केलं. हार्दिक आणि कृणालच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याची बाब निदर्शनात येताच त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. पण, त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत.
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार निर्धारित षटकांच्या सामन्यांनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्याहून मायदेशी परतलेला हार्दिक वडिलांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा त्यांच्यासोबतच होता. त्याच्या वडिलांच्या निधनाचं वृत्त कळताच विराट कोहलीनं ट्विट करत हार्दिकच्या कुटुंबाला आधार देत हिमांशु पांड्या यांना श्रद्धांजली वाहिली.