नवी दिल्ली : WhatsApp या सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अॅपनं मागील काही दिवसांपासून नवं गोपनीयता धोरण लागू करण्यासाठीची पावलं उचलण्यास सुरुवात केली होती. यासाठी युझर्सना हे धोरण स्वीकारण्यासाठीचं आवाहनही करण्यात आलं. तसा मेसेजही अनेकांपर्यंत पोहोचला. WhatsAppचं हे नवं धोरण न स्वीकारणाऱ्यांचं अकाऊंट बंद होणार असल्याची बाबही स्ष्ट करण्यात आली होतं.
WhatsAppकडून हे नवं धोरण आणलं जात असल्याची चर्चा सुरु होताच मोठ्या संख्येनं हे अॅप वापरणाऱ्यांमध्ये मात्र नाराजीची लाट पाहायला मिळाली. काहींनी या धोरणाचं समर्थन केलं, तर काहींनी मात्र त्यावर नकारात्मक सूरही आळवला. युझर्सच्या याच नाराजीनंतर WhatsAppनं एक पाऊल मागे घेत, गोपनीयता धोरणाला तूर्तास स्थगिती देण्याचा निर्णय़ घेतला आहे.
WhatsApp द्वारे GIF व्हिडीओ कसा पाठवायचा? जाणून घ्या सोपी पद्धत
नव्या गोपनीयता धोरणाला अनुसरून वापरकर्त्यांमध्ये बऱ्याच अंशी संभ्रम आहेत. तेच दूर करण्यासाठी आणि हे धोरण समजून घेण्याचा वेळ देण्यासाठी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळं किमान पुढील तीन महिने ही स्थगिती कायम राहणार आहे. शिवाय कोणत्याही युझरचं अकाऊंट बंद करण्याचा निर्णय अद्यापही घेण्यात आलेला नाही किंबहुना भविष्यातही असा निर्णय घेतला जाणार नाही, असंही व्हॉट्सअॅपकडून स्पष्ट करण्यात आलं.
WhatsApp कडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, '8 फेब्रुवारीला कोणालाही व्ह़ॉट्सअॅप अकाऊंट सस्पेंड अथवा डिलीट करावं लागणार नाही. या अॅपवर गोपनीयता आणि सुरक्षितता धोरण कशा प्रकारे काम करतं यासाठी आम्ही काही पावलं उचलत आहोत. 15 मे रोजी नवा अपडेट पर्याय उपलब्ध होण्यापूर्वी आम्ही या धोरणाबाबतचे संभ्रम दूर करु', असं म्हटलं गेलं आहे.