दुबई : टीम इंडियाचा ऑल-राऊंडर हार्दिक पंड्याला दुखापतीमुळे संघाबाहेर व्हावं लागलं आहे. काल पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावेळी गोलंदाजी करत असताना, हार्दिकच्या कंबरेला दुखापत झाली आणि तो जागीच कोसळला. त्यानंतर त्याला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर नेऊन उपचार सुरु करण्यात आले.

हार्दिकच्या कंबरेला झालेली दुखापत गंभीर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्याला संघातून बाहेर व्हावं लागलं आहे.

हार्दिकच्या जागी दीपक चहर

हार्दिक पंड्या संघातून बाहेर झाल्यानंतर, त्याच्या जागी ऑल-राऊंडर दीपक चहरची निवड झाली आहे. दीपक चहर आजच दुबईत जाणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली.



दीपक चहरने इंग्लंडमध्ये टी-20 सीरीजमधून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती, त्यावेळी बुमराहच्या जागी चहरला टीममध्ये घेण्यात आले होते.

...आणि हार्दिक पंड्या दुबईतील मैदानावरच कोसळला

आशिया चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने बाजी मारत, विजयाची नोंद केली. मात्र या सामन्यादरम्यान भारताला धक्का देणारी एक घटना घडली, ती म्हणजे भारताचा ऑल-राऊंडर हार्दिक पंड्याच्या कंबरेला दुखापत झाली. हार्दिक पंड्या गोलंदाजी करतानाच दुखापतग्रस्त झाला. पाठीत त्रास जाणवल्यामुळे त्याला स्ट्रेचरवर बाहेर नेण्यात आलं.

अठराव्या षटकात गोलंदाजी करताना चेंडू फेकताच पंड्या खाली कोसळला. यानंतर त्याला प्रचंड वेदना झाल्याचंही दिसून आलं. फिजिओ मैदानात धावत आले, मात्र पंड्याला वेदना होत असल्याने अखेर त्याला स्ट्रेचरवरुन मैदानातून बाहेर नेण्यात आलं.

पंड्याच्या जागी मनीष पांडे क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला होता. मनीष पांडेने येताच एक अफलातून झेल घेतला. केदार जाधवच्या गोलंदाजीवर मनीष पांडेने पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदचा हा झेल घेतला.