नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा ज्यांच्या मार्गदर्शनानं पुढे गेली, त्या डॉ. गोळवलकर लिखित ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकापासून संघानं पहिल्यांदाच स्वतःला दूर केलंय. त्या पुस्तकातले संदर्भ तत्कालीन होते, ते विचार आता संयुक्तिक नाहीत, असे दस्तुरखुद्द सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले आहेत.
अस्पृश्यतेच्या समर्थनासह अनेक गोष्टी ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकात आहेत. मात्र आतापर्यंत संघाकडून कुणीही थेटपणे याबाबत भाष्य केलेलं नव्हतं. काल दिल्लीत ते बोलत होते. गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने व्याख्यानमालेचं आयोजन केलं होतं. काल त्याचा शेवटचा दिवस होता.
‘बंच ऑफ थॉट्स’वर मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?
“बंच ऑफ थॉट्समधील विचार परिस्थितीजन्य, त्यावेळच्या प्रसंगांच्या संदर्भात आहेत. त्या गोष्टी शाश्वत राहत नाहीत. मात्र, गुरुजींचे जे शाश्वत विचार आहेत, त्यांचं संकलन करुन ‘श्री गुरुजी : व्हिजन अँड मिशन’ पुस्तक प्रसिद्ध कले आहे. त्यामध्ये तत्कालीन सर्व गोष्टी वगळून सर्व काळासाठी उपयुक्त विचार ठेवण्यात आले आहेत. ते तुम्ही वाचा. त्यामधून सर्व गोष्टी तुम्हाला कळून जातील.”, असे मोहन भागवत म्हणाले.
याच कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षण, एससी-एसटी अॅक्टसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.
भागवत नेमकं काय म्हणाले आरक्षणावर?
“सामाजिक विषमता नाहीशी करुन, सर्वांना समान संधी मिळावी म्हणून घटना बनवली गेलीय. घटनेने आरक्षणाची जी व्यवस्था तयार केलीय, तिला संघाचं पूर्ण समर्थन आहे. आता हे आरक्षण कधीपर्यंत ठेवायचं हे त्यांनीच ठरवायचंय, ज्यांना लाभ मिळतोय. जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ते क्रिमीलेयरचं काय करायचं ते ठरवतील. आरक्षण समस्या नसून, आरक्षणावरील राजकारण ही समस्या आहे. जे खड्ड्यात पडले आहेत, त्यांच्या हातात हात देऊन आपण वर आणलं पाहिजे. एक हजार वर्षांपासूनचा अन्याय दूर करण्यासाठी 100-150 वर्षे झुकून राहावं लागलं, तर ती मोठी गोष्ट नाही. सर्वच आपले आहेत.”, असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.
एससी-एसटी अॅक्टवर काय म्हणाले भागवत?
“जी परिस्थिती आहे, ती दूर करण्यासाठी कायदा बनवला गेलाय. त्या कायद्याला नीट लागू केला पाहिजे. त्याचा दुरुपयोग व्हायला नको. सद्भावना निर्माण करण्याची मोठी गरज आहे. संघाची इच्छा अशीय की, सामाजिक सद्भावाने या गोष्टी सोडवल्या पाहिजेत.”, असे एससी-एसटी अॅक्टवर बोलताना मोहन भागवत म्हणाले.
‘बंच ऑफ थॉट्स’चे विचार तत्कालीन, आता संयुक्तिक नाहीत : भागवत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Sep 2018 11:10 AM (IST)
अस्पृश्यतेच्या समर्थनासह अनेक गोष्टी ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकात आहेत. मात्र आतापर्यंत संघाकडून कुणीही थेटपणे याबाबत भाष्य केलेलं नव्हतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -