मुंबई : भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने फिफा वर्ल्डकपच्या निमित्ताने देशातील राजकारणावर भाष्य केलं आहे. फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यात फिफा वर्ल्डकपचा अंतिम सामना काल रंगला. या सामन्याचं निमित्त साधत हरभरजनने ट्वीट करत म्हटलं की, क्रोएशिया फुटबॉल वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळत आहे आणि आपण 135 कोटी भारतीय हिंदू-मुस्लीम खेळत आहोत.
क्रोएशियाचा अंतिम सामन्यात फ्रान्सने 4-2 असा पराभव केला. मात्र क्रोएशियाने फ्रान्सला कडवं आव्हान दिलं.
हरभजन सिंगने काल फुटबॉलच्या अंतिम सामन्याआधी ट्वीट केलं. हरभजनने ट्वीटमध्य म्हटलं की, "जवळपास 50 लाख लोकसंख्येचा क्रोएशिया सारखा देश फुटबॉल वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात खेळत आहे. मात्र 135 कोटींचा आपला देश हिंदू-मुस्लीम खेळत आहे. विचार बदला, देश बदलेल."
मोदींकडून शुभेच्छा
फुटबॉल वर्ल्डकपवर नाव कोरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचं अभिनंदन केलं, तसेच क्रोएशियालाही शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं की, "एक सुंदर सामना! फ्रान्सला फिफा वर्ल्डकप जिंकल्याबद्दल शुभेच्छा. पूर्ण मालिकेत खासकरुन अंतिम सामन्यात फ्रान्सने चांगला खेळ केला. क्रोएशियाच्या उत्साहपूर्ण खेळाबद्दल त्यांनाही शुभेच्छा. क्रोएशियाने संपूर्ण वर्ल्डकपमध्ये ऐतिहासिक प्रदर्शन केलं आहे."
फ्रान्सने दुसऱ्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं
फिफाच्या इतिहासात वर्ल्डकप जिंकण्याची फ्रान्सची ही दुसरी वेळ ठरली. फ्रान्सने याआधी 1998 साली ब्राझिलचा 3-0 असा धुव्वा उडवून वर्ल्डकप जिंकला होता. फ्रान्सचे विद्यमान प्रशिक्षक डिडियर डेशॉ यांच्याच नेतृत्त्वाखाली फ्रान्सने 1998 सालचा वर्ल्डकप जिंकला होता.
वर्ल्डकपमध्ये क्रोएशिया एकही सामना न हारता अंतिम सामन्यात पोहोचली होती. क्रोएशियाने अर्जेंटिना, रशिया आणि इंग्लंड या बलाढ्या संघाचा पराभव केला होता. 1998 साली क्रोएशियाने फुटबॉल वर्ल्डकपमध्ये प्रवेश केला होता आणि त्याच वर्षी फ्रान्सन वर्ल्डकपवर पहिल्यांदा आपलं नाव कोरलं होतं. त्या वर्ल्डकपमध्ये क्रोएशिया संघ तिसऱ्या स्थानावर होता.