मुंबई : दूध उत्पादकांना प्रतिलीटर पाच रुपये अनुदान मिळावं यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन तीव्र झालं आहे. असं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केलेला नाही आणि कुठलीही चर्चा झालीच नसल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं.


दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टींना चर्चेसाठी बोलावलं मात्र ते चर्चेला येत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी आजच्या पत्रकारांसोबतच्या चर्चेत म्हंटलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य राजू शेट्टींनी पूर्णपणे खोडून काढलं. खोटा प्रचार करण्यासाठी आंदोलन खोडून काढण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप शेट्टींनी केला.

दरम्यान, गिरीश महाजनांच्या कार्यालयातून फोन आला होता, शिवाय महादेव जानकर यांच्याशीही बोलणं झालं, मात्र ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं.

LIVE UPDATES




  • येरमाळा येथे नेचर डिलाईट डेअरीचा पिकअप दूध वाहतूक करताना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पेटवला

  • मुख्यमंत्र्यांनी फोन केलेला नाही, माझी काहीही चर्चा झाली नाही, राजू शेट्टी यांची माहिती, आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला जातोय, दुपारी गिरीश महाजन यांच्या कार्यालयातून फोन आलेला, तसंच महादेव जानकर यांचा फोन आला, पण ठोस आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, राजू शेट्टींची भूमिका

  • उद्या कात्रज डेअरीचं दूध संकलन बंद राहणार

  • सोलापूर - सहकारमंत्री सुभाष देशमुखांच्या घरासमोर आंदोलन, अखिल भारतीय किसान सभेने दूध ओतलं, किसान सभेचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महादेव जानकर यांची फोनवरुन राजू शेट्टींशी चर्चा, आंदोलन चिघळू नये, चर्चेने समस्या सोडवण्यासाठी सरकारकडून हालचाली..

  • शेतकऱ्यांसाठी नाही तर लोकसभेची निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन एका व्यक्तीसाठी हे आंदोलन सुरू आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टींना टोला.

  • सांगलीत आटपाडी रोडवर बस्तवडे फाट्याजवळ शेतकऱ्यांनी दूध ओतून न देता रस्त्यावरून जाणाऱ्यांना दूध गरम करुन वाटप केलं.

  • शिवसेनेचाही दूध आंदोलनाला पाठिंबा देत दूध उत्पादकांना थेट पाच रुपये अनुदान देण्याची मागणी केली. विधानसभेत शिवसेना आमदार चंद्रदीप नरके यांनी ही मागणी केली.

  • शिर्डी- स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरु. श्रीरामपूर स्वाभिमानी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुभाष पटारे यांचेसह तीन कार्यकर्ते ताब्यात.

  • गोकुळ दूध संघाचे दूध पोलीस बंदोबस्तात मुंबई कडे रवाना. 12 टँकर मुंबई कडे रवाना झाले असून, पुणे- बेंगलोर राष्ट्रीय माहामार्गावर पोलिसाचं पेट्रोलिंग सुरु आहे.

  • दुधाच्या दराचा तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून 70/30 च्या फॉर्म्युल्यावर विचार सुरु, महाराष्ट्रात साखर कारखान्यांना लागू असलेला हा फॉर्म्युला दुधासाठी लागू करण्याचा सरकारचा विचार, मंत्रालयातील सूत्रांची माहिती

  • स्वाभिमानी शेतकरी संघटना बुलडाण्यात आक्रमक. पहाटे वाघजाळ फाट्याजवळ विकास दुधाची गाडी फोडली.

  • औरंगाबाद वैजापूर तालुक्यातील हडस पिंपळगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेन दुधाच्या बॅग रस्त्यावर फेकल्या. संगमनेरहून औरंगाबादकडे जाणारा नवले कंपनीचा दुधाने भरलेला टेम्पो अडवून त्यातील दुधाच्या बॅग रस्त्यावर फेकल्या.


 

अमरावतीत राजू शेट्टींच्या काही कार्यकर्त्यांनी दुधाचा एक टँकर फोडण्याचा प्रयत्न केला. मध्यप्रदेशातून नागपूरला हा दूधाचा टँकर जात होता. त्यामुळे शहरांना होणारी दुधाची रसद बंद करण्यासाठी मध्यरात्रीपासून राज्यातल्या विविध ठिकाणी प्रयत्न होताना दिसत आहेत.

नेमक्या मागण्या काय?

- दूध उत्पादकांना सावरण्यासाठी प्रतिलिटर पाच रुपये सरकारला देणं शक्य आहे. गोवा, कर्नाटक सरकार अशी मदत करतं. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही तशी मदत करावी, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे.


- पाच रुपयांच्या अनुदानाची ही मागणी गाईच्या दुधासाठी असून दररोज अतिरिक्त ठरणारं चाळीस लाख लिटर गाईच दुध सराकरने सत्तावीस रुपये प्रति लिटर दराने खरेदी करण्याची मागणीही स्वाभिमानीकडून करण्यात आली आहे.


- या आंदोलनातून मुंबईला होणारा दूध पुरवठा रोखण्याचा स्वाभिमानीचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे रविवारी मध्यरात्रीपासून मुंबईची दूधकोंडी होण्याची शक्यता आहे.


दूध उत्पादकांना संरक्षण देणार : जानकर


काहीही झालं तरी मुंबईचा दूध पुरवठा कमी होऊ देणार नाही, आमचेही कार्यकर्ते मैदानात आहेत, असं पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.


ज्यांना आंदोलन करण्याची इच्छाच आहे, त्यांच्याबद्दल आम्ही काही सांगू नाही शकत. पण मुंबईला दूध पुरवठा कमी होणार नाही, संरक्षण दिलं जाईल, आमचेही कार्यकर्ते मैदानात आहेत. दूध उत्पादकांनी न घाबरता दूध पुरवठा करावा, तुम्हाला पोलीस संरक्षण दिलं जाईल, असं महादेव जानकर यांनी सांगितलं.