मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आज 31 वर्षांचा झाला. वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी विराट हा देशातला सर्वात यशस्वी क्रिकेटर आहेच, पण एक आदर्श म्हणून साऱ्या देशातली तरुणाई आज त्याच्याकडे मान उंचावून पाहते. बच्चेकंपनी भारतीय कर्णधाराच्या आकंठ प्रेमात बुडालेली आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना सचिन तेंडुलकरनंतर आता विराट कोहलीमध्ये आपला आधार दिसतो आहे. विराट कोहली नावाचा दबदबा क्रिकेटनं सर्वदूर पोहोचवला आहे.


फॅशनविश्वात तो आज रोल मॉडेल आहे. जाहिरातींच्या दुनियेतही विराट हे नाव लखलखताना दिसतंय. आजच्या युवा पिढीसाठी विराट हा फिटनेस आयकॉनही बनला आहे. एका अर्थाने विराट कोहली हा भारतातला आजचा टॉप ब्रॅण्ड बनलाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विराटची ब्रॅण्ड व्हॅल्यूही त्याच्या नावाइतकीच विराट झाली आहे.

आज विराटची लोकप्रियता इतकी आहे की लोकप्रियतेच्या आघाडीवर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिग बी अमिताभ बच्चन, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याशीही शर्यत करु शकतो. पण विराट कोहली या नावाची लोकप्रियता ही काही एका रात्रीत तयार झालेली नाही. त्यामागे सबळ कारणंही आहेत.

विराटने नुकतीच तिशी पार केली आहे. तो तरुण आहे...देखणा आहे.. सुपर फिट आहे आणि यशस्वीदेखील. विराटची आक्रमक देहबोली, त्याचा निडरपणा ही वैशिष्ट्ये आजच्या तरुणाईला अधिक भावतात. विराटच्या अभिनेत्री अनुष्का शर्मासोबतच्या विवाहाने एक कमिटेड कपल म्हणूनही त्या दोघांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. पण विराट आणि त्याच्या ब्रॅण्डला जगाच्या बाजारात आलेली किंमत ही त्याने क्रिकेटच्या मैदानात मिळवलेलं यश आणि त्यामुळेच मिळालेल्या लोकप्रियतेचा संगम आहे.

विराट कोहली हे नाव आज क्रिकेटपुरतंच मर्यादित राहिलेलं नाही. त्याच्या नावावर आज बाजारात करोडो रुपयांची उलाढाल होताना दिसते. विराटचं नाव लागलं की स्पॉन्सर्सही खूष असतात. त्यामुळेच प्रो कबड्डी लीगच्या उद्धाटनासाठी स्टार स्पोर्टसकडून विराट कोहलीला निमंत्रित करण्यात येतं. त्यामुळे तो कधी कबड्डीच्या मैदानात दिसतो तर कधी फुटबॉलच्या. इंडियन सुपर लीगमधल्या एफ सी गोवा या फ्रॅन्चायजीचा तो को-ओनर आहे.

विराटला मिळालेली अमाप लोकप्रियता आणि त्याचं घवघवीत यश यामागे आहे ती गेली सात वर्षे त्याने घेतलेली मेहनत. 2012 सालच्या आयपीएलमधल्या अपयशानं विराट कोहलीला एक धडा शिकवला. त्यावेळी त्याने आरशात पाहिलेली स्वत:ची प्रतिमा ही उज्ज्वल भविष्याचे संकेत देणारी होती. तिथेच विराटने ठरवलं की आपण आता बदलायचं. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये वर्चस्व गाजवायचं तर आपल्याला फिट नाही तर सुपरफिट व्हायला हवं. हे विराटने ओळखलं. त्याने फिटनेसवर भर दिला. खाण्यापिण्यावर बंधनं आणली. एखाद्या वेटलिफ्टरला साजेसं वेटट्रेनिंग त्याच्या व्यायामाचं भाग बनलं. याच कठोर मेहनतीतून उदयास आला तो विराट कोहली नावाचा सुपर अॅथलीट...

एक फलंदाज म्हणून विराट आधीच मोठा होता. पण सुपर फिटनेसने त्याचा सक्सेस रेट उंचावला आणि माणूस यशस्वी ठरला की लोकप्रियता चालून येते. विराटचं यश, त्याचं सातत्य आणि त्याचा सुपर फिटनेस यांनी त्याला लोकप्रियतेच्या एव्हरेस्टवर नेऊन ठेवलंय. तेही वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी... वेल डन विराट.