टोरंटो: जगज्जेत्या बुद्धीबळपटूला आव्हान देणारा खेळाडू निवडण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या कँडिडेटस स्पर्धेत भारताचा 17 वर्षीय ग्रँडमास्टर डी.गुकेश (Gukesh D) याने इतिहास रचला आहे. डी.गुकेशने ही स्पर्धा जिंकत सर्वात लहान आव्हानवीर होण्याचा मान त्याने मिळवला आहे. कँडिडेटस स्पर्धेच्या (Candidates tournament) अंतिम टप्प्यात अमेरिकेच्या हिकारु नाकामुरा आणि डी.गुकेश यांच्यात सामना झाला. हा सामना बरोबरीत सुटला. मात्र, सरस गुणसंख्येच्या जोरावर डी.गुकेशने या स्पर्धेचा विजेता होण्याचा मान पटकावला.


कँडिडेटस स्पर्धेत प्रत्येक सामन्यासाठी खेळाडूला गुण मिळतात. सामना जिंकला किंवा बरोबरीत सुटला यानुसार गुणांचे वाटप केले जाते. अंतिम गुणसंख्येनुसार डी.गुकेशने 9 गुणांसह प्रथम स्थान पटकावले. त्यामुळे गुकेश या स्पर्धेचा विजेता ठरला. या स्पर्धेत गुकेश पाठोपाठ नाकामुरा, कारुआना फॅबिओ इयान नेपोनिआच हे 8.5 गुण मिळवत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी राहिले.


कँडिडेटस स्पर्धा जिंकल्यामुळे आता डी.गुकेश चीनचा ग्रँडमास्टर डिंग लिरेन याला आव्हान देईल. यावर्षीच्या अखेरीस या दोघांमध्ये जगज्जेतेपदासाठी सामना होईल. डी. गुकेश हा भारताचा दिग्गज बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद याच्यानंतर कॅन्डिडेट्स बुद्धीबळ स्पर्धा जिंकणारा दुसरा भरतीय बुद्धीबळपटू ठरला आहे.


 






गुकेशने गॅरी कास्पारोव्हचा विक्रम मोडला


गुकेशने वयाच्या १७ व्या वर्षी ही स्पर्धा जिंकली असून तीन दशकांपासून अबाधित असलेला रशियन बुद्धीबळपटू गॅरी कास्पारोव्हचा विक्रम त्याने मोडीत काढला आहे. १९८४ च्या कॅन्डिडेट्स बुद्धीबळ स्पर्धेत रशियन ग्रँडमास्टर गॅरी कास्पारोव्ह याने वयाच्या २२ व्या वर्षी ही स्पर्धा जिंकली होती. गुकेशच्या या विजयानंतर विश्वनाथन आनंद याने ट्विट करुन त्याचे अभिनंदन केले. सर्वात लहान आव्हानवीर झाल्याबद्दल अभिनंदन. आम्हा सर्वांना तुझा अभिमान आहे. मला वैयक्तिकरित्या तू ज्याप्रकारे खेळलास, अवघड परिस्थिती ज्याप्रकारे हातळलीस त्याचा खूप अभिमान वाटतो. या क्षणाचा आनंद घे, असे विश्वनाथन आनंदने ट्विटमध्ये म्हटले आहे.


आणखी वाचा


शतरंज का नया बादशाह! 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद यांना मागे टाकणारा 17 वर्षीय गुकेश डी नक्की आहे तरी कोण?