राजकोट: गुजरात लायन्सनं रायझिंग पुणेचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून, आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला आपला पहिला विजय साजरा केला. गुजरातला पहिल्या दोन सामन्यांमध्ये कोलकाता आणि हैदराबादकडून हार स्वीकारावी लागली होती. पण अखेर राजकोटच्या मैदानात गुजरातनं पुण्यावर बारा चेंडू आणि सात विकेट्स राखून विजय साजरा केला.

या सामन्यात गुजरातच्या अँड्र्यू टायनं हॅटट्रिकसह पाच विकेट्स घेऊन पुण्याला 20 षटकांत आठ बाद 171 धावांत रोखलं. त्यानंतर ड्वेन स्मिथ आणि ब्रेन्डन मॅक्युलमनं 93 धावांची सलामी देऊन गुजरातच्या विजयाचा पाया रचला.

सुरेश रैना आणि अॅरॉन फिन्चनं चौथ्या विकेटसाठी केलेल्या 61 धावांच्या अभेद्य भागिदारीनं गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

एकाच दिवशी दोन हॅटट्रिक

बंगळुरुचा लेग स्पिनर सॅम्युअल बद्री आणि गुजरातचा वेगवान गोलंदाज अँड्र्यू टाय या दोघांनीही आयपीएलच्या रणांगणात एकाच दिवशी हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम गाजवला.

बद्रीने मुंबईच्या डावातल्या तिसऱ्याच षटकात पार्थिव पटेल, मिचेल मॅकलेनहान आणि रोहित शर्मा यांना लागोपाठच्या तीन चेंडूंवर माघारी धाडण्याची कामगिरी बजावली.

मुंबईच्या डावात त्याच्या गोलंदाजीचं पृथःकरण होतं चार षटकं, एक निर्धाव नऊ धावा आणि चार विकेट्स. आयपीएलमध्ये हॅटट्रिक साजरी करणारा बद्री हा आजवरचा बारावा, तर अँड्र्यू टाय हा तेरावा गोलंदाज ठरला.

गुजरातच्या अँड्र्यू टायने अखेरच्या षटकात पुण्याच्या अंकित शर्मा, मनोज तिवारी आणि शार्दूल ठाकूर यांना लागोपाठच्या तीन चेंडूंवर बाद केलं. पण विशेष म्हणजे अँड्र्यू टायने हॅटट्रिकसह पाच विकेट्स घेण्याचाही पराक्रम गाजवला. पुण्याच्या डावात त्याचं पृथक्करण चार षटकं, 17 धावा आणि पाच विकेट्स असं होतं.

मुंबई आणि बंगळुरु यांच्यातील सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून बंगळुरुला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं. बंगळुरुने  मुंबईला विजयासाठी 143 धावांचं आव्हान दिलं. त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईची तिसऱ्याच षटकात चार बाद 7 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर कायरन पोलार्ड आणि कृणल पांड्या यांनी मुंबईची पडझड होऊ दिली नाही.

कायरन पोलार्ड आणि कृणाल पंड्यानं सहाव्या विकेटसाठी रचलेल्या 93 धावांच्या भागिदारीनं मुंबई इंडियन्सला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर सात चेंडू आणि चार विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला.