रिओ दि जनैरो : रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची गोल्फपटू अदिती अशोकला 41व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. ऑलिम्पिकमध्ये 112 वर्षांनी पुनरागमन केलेल्या गोल्फमध्ये 18 वर्षीय अदितीने भारताचं प्रतिनिधित्व केलं.
साक्षी-सिंधू पाठोपाठ अदितीही पदक पटकावून भारताची मान उंचावेल, अशी अपेक्षा भारतीयांकडून व्यक्त केली जात होती. अदिती अशोकने अंतिम फेरीत प्रवेश करुन पदकाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अदितीला अंतिम फेरीत आपला फॉर्म कायम राखता आला नाही.
अदितीने तिसऱ्या फेरीत 79 गुण मिळवल्यामुळे तिची 31 व्या स्थानावर घसरण झाली होती. त्यामुळे भारताच्या गोल्फमधल्या पदकाच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या.