नवी दिल्ली: आंदमान-निकोबारच्या सेल्यूलर कारागृहात बंदी असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मासिक पेंशनमध्ये 5000 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता स्वातंत्र्य सैनिकांना 30,000 रुपये मासिक पेंशन मिळणार आहे. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणानंतर याबाबत घोषणा केली होती.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्य सैनिकांसाठी पेंशनमध्ये अंदमानच्या जेलमधील माजी राजकीय कैदी आणि त्यांच्या पत्नींना आतापर्यंत 24,775 रुपये पेंशन मिळत होती, आता ती वाढून 30,000 रुपये करण्यात आली आहे.
ब्रिटिश कालीन भारताबाहेर शिक्षा भोगणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना 23,085 रुपये पेंशन मिळत होती. आता त्यामध्ये वाढ करून 28,000 रुपये करण्यात आली आहे. आझाद हिंद सेनेच्या सदस्यांसोबत इतर स्वातंत्र्य सैनिकांची पेंशन 21,395 रुपयांवरून 26,000 रुपये करण्यात आली आहे.
देशाच्या 70 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना स्वातंत्र्य सैनिकांच्या पेंशनमध्ये 20% वाढ करण्याची घोषणा केली होती.
दरम्यान, यावर अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्ट 2016 पासून केंद्रीय स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या वारसांच्या 'स्वातंत्र्य सैनिक सन्मान पेंशन'मध्ये ही वृद्धी करण्यात आली आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांचे मानधन वाढवून सैनिकांना मिळणाऱ्या राशीच्या 50% करण्यात आली आहे. सध्या देशात 37 हजार स्वातंत्र्यसैनिक आहेत.