Glenn phillips catch of virat kohli : दुबईत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गट टप्प्यातील शेवटचा सामना खेळला जात आहे. किंग विराट कोहलीसाठी हा सामना अत्यंत खास होता. कारण हा त्याचा 300 वा एकदिवसीय सामना होता. मात्र, या स्पेशल सामन्यात त्याला मोठी खेळी करता आली नाही. कोहली केवळ 11 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक असलेल्या ग्लेन फिलिप्सने त्याला अभूतपूर्व पद्धतीने झेपावत झेलबाद केले.
हवेत झेपावत एका हातात कॅच टिपला
भारताला 30 धावांवर विराट कोहलीच्या रूपाने तिसरा धक्का बसला. मॅट हेन्रीने टाकलेल्या 7व्या षटकातील चौथ्या चेंडूवर विराट कोहलीने ऑफमध्ये शॉट मारण्याचा प्रयत्न केला. बॉल पॉइंटच्या दिशेने गेला असतानाच तिथे उभ्या असलेल्या ग्लेन फिलिप्सपासून थोडा दूर होता. पण नेत्रदीपक हवेत उडी मारल्यानंतर फिलिप्सने एका हाताने झेल टिपला. फिलिप्सची झेप पाहून किंग विराट कोहली सुद्धा काही काळ स्तब्ध झाला आणि काय झालं हे पाहत राहिला.
अनुष्का शर्माने कपाळाला हात लावला
ग्लेन फिलिप्सने तो अप्रतिम झेल घेतल्याने विराट कोहलीलाही आश्चर्य वाटले. स्टँडवर बसलेली पत्नी अनुष्का शर्माही निराश झाली. तिने कपाळाला हात लावला, ज्याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. विराटचा 300 वा सामना पाहण्यासाठी अनुष्का दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पोहोचली. कोहलीच्या आधी कर्णधार रोहित शर्मा 15 धावा करून आणि शुभमन गिल 2 धावा करून बाद झाला. गिललाही मॅट हेन्रीने बाद केले, तर कर्णधार काइल जेमिसनच्या चेंडूवर झेलबाद झाला.
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. मात्र, हा सामना महत्त्वाचा आहे कारण त्याचा निकाल ठरवेल की उपांत्य फेरीचे सामने कोणत्या संघांमध्ये खेळवले जातील. भारत 4 मार्चला दुबईत उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे, तर न्यूझीलंडचा उपांत्य सामना 5 मार्चला होणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल आणि पराभूत झालेला संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळेल.