पुणे : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक मोठी घडामोड घडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी पुण्यात एकाच गाडीतून प्रवास केला. सर्किट हाऊसपासून कौन्सिल हॉलपर्यंत झालेल्या या प्रवासात दोघांमध्ये तब्बल दहा मिनिटे चर्चा झाली. यावेळी जानकर यांच्यासोबत उमेश पाटील देखील उपस्थित होते.


नेमकी चर्चा कशावर?


उत्तम जानकर आणि अजित पवार यांच्यात कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, यावर प्रतिक्रिया देताना उमेश पाटील यांनी स्पष्ट केलं की, माळशिरस तालुक्यात उजनी धरणातून पंधरा दिवस आधी पाणी सोडण्याची जानकर यांची मागणी आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी ही भेट झाली. गर्दीमुळे अजित पवार यांनी गाडीत बसून चर्चा करण्याचा पर्याय सुचवला, असं पाटील यांनी सांगितलं आहे. 


राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क


उत्तम जानकर हे शरद पवार गटाचे प्रमुख नेते असून, त्यांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन करत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची मागणी आहे की, निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या जाव्यात. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या अजित पवारांसोबतच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. याआधी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. त्यानंतर सरकारने जयंत पाटील आणि उत्तम जानकर यांच्यासाठी पीएची नियुक्ती केली होती, ज्याचा खर्च सरकारी तिजोरीतून केला जाणार आहे.या पार्श्वभूमीवर जानकर आणि अजित पवार यांची चर्चा आणि भेट नक्कीच महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीमागे नेमकं काय राजकारण दडलं आहे, याबाबत चर्चा रंगली आहे.


उमेश पाटलांनी दिली माहिती


उमेश पाटील यांनी या भेटीबाबत बोलताना म्हटलं की, उजनी धरणातून माळशिरस तालुक्यात पंधरा दिवस अगोदर पाणी सोडावे, अशी जानकर यांची मागणी आहे. यासाठीच भेट घ्यायाची होती, मात्र दादांकडे गर्दी असल्यामुळे दादा म्हणाले गाडीत बसून बोलू, दादा मला आणि उत्तमराव जानकर यांना म्हणाले गाडीत बसा आपण गाडीत बोलूया, असं पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र या भेटीमुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.