राहुलने सव्वा तासात तीन कुस्त्या एकहाती जिंकून ढाण्यावाघासारखी फायनलमध्ये धडक मारली. फायनलध्ये त्याचा मुकाबला कॅनडाच्या स्टीव्हन ताकाहाशी विरोधात होता.
राहुलची शरिरयष्टी स्टीव्हन ताकाहाशीच्या तुलनेत किरकोळ होती. राहुल ही कुस्ती मारणार का असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र राहुलने पहिल्यापासूनच चित्त्यासारखी चपळाई दाखवली. राहुलने सुरुवातीलाच 2 मेडल मिळवत आघाडी मिळवली.
त्यानंतर राहुल वाघासारखा झुंजला. त्याने स्टीव्हनला अक्षरश: मानही वर काढू दिली नाही. त्याचाच परिणाम म्हणजे तब्बल 15-7 अशा मोठ्या फरकाने राहुल जिंकला.
गोल्ड कोस्टच्या समुद्रमंथनात राहुल आवारेच्या हाताला सोनं लागलं आणि दिवंगत रुस्तम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदारांचं स्वप्न साकार झालं.
राहुल आवारेनं ५७ किलो गटाच्या पहिल्या दोन्ही कुस्त्यांवर अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. त्यानं इंग्लंडचा जॉर्ज रॅम आणि ऑस्ट्रेलियाचा थॉमस सिचिनी यांना लिलया हरवलं. मग राहुलनं पाकिस्तानच्या मुहम्मद बिलालला १२-८ असं नमवून अंतिम फेरीत धडक मारली.
निर्णायक कुस्तीत राहुल आवारेचा मुकाबला होता कॅनडाच्या स्टीव्हन ताकाहाशीशी. तोही तितकाच ताकदीचा पैलवान होता. पण राहुलनं
ताकाहाशीचा कडवा संघर्ष १५-७ असा आठ गुणांनी मोडून काढला आणि सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.
गोल्ड कोस्टच्या भूमीतलं गोल्ड हे राहुल आवारेनं आंतरराष्ट्रीय कुस्तीत मिळवलेलं हे तिसरं मोठं यश होतं. याआधी २०११ साली त्यानं राष्ट्रकुल कुस्तीत सुवर्ण आणि आशियाई कुस्तीत कांस्य अशी कामगिरी बजावली आहे. राहुलनं आजवरच्या कारकीर्दीत २१ लहानमोठ्या पदकांची कमाई केली आहे. त्यात राष्ट्रीय कुस्तीतल्या सलग सहा विजेतीपदांचाही समावेश आहे.
कोण आहे राहुल आवारे?
राहुल आवारे हा मूळचा बीड जिल्ह्यातल्या पाटोद्याचा पैलवान. तसं पाहिलं तर आवारे कुटुंब हे मूळचं नगर जिल्ह्यातल्या माळेवाडीचं. राहुलचे वडील बाळासाहेब आवारेनी आपल्या लेकरांच्या चांगल्या भविष्यासाठी माळेवाडीतून पाटोद्यात स्थलांतर केलं.
एका जमान्यात बाळासाहेब आवारे हे स्वत: पट्टीचे पैलवान होते. राहुल आणि धाकट्या गोकुळला त्यांनीच त्याचे कुस्तीची गोडी लावली. पाटोद्यातल्या पत्र्याच्या शेडमध्ये राहुलनं पैलवानकीची बाराखडी गिरवली. मग हरिश्चंद्र बिराजदारांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला.
बिराजदार मामांच्या आकस्मिक निधनानंतर राहुल अर्जुनवीर काका पवारांच्या तालमीत दाखल झाला. पण बिराजदार मामांची गोकुळ वस्ताद तालीम असो किंवा काका पवारांचं कात्रजमधलं आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल... दोन्ही तालमींचं घराणं एकच आहे बिराजदार मामांचं घराणं. कारण काका पवार हेही बिराजदार मामांचेच शिष्य. त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गानं जाणारा पांथस्थ. त्यामुळं एका अर्थानं दोन्ही तालमी म्हणजे त्या हरिश्चंद्राच्या फॅक्टरी. याच फॅक्टरीत राहुल घडला.
ऑलम्पिकमधून हटवलं, राष्ट्रकुलमध्ये करुन दाखवलं!
भारतीय कुस्ती महासंघानं राहुलवर बेशिस्त वर्तनासाठी बंदीची कारवाई केली होती. या कारवाईमुळे राहुलची तुर्कस्तानच्या इस्तंबूलमधल्या दुसऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत खेळण्याची संधी हुकली होती.
खरंतर जॉर्जियामध्ये भारतीय कुस्ती संघाचं सराव शिबीर झालं होतं. जॉर्जियाहून संपूर्ण संघ तुर्कस्तान आणि मंगोलियासाठी जाणार होता. पण राहुलला केवळ जॉर्जियाचा व्हिसा देण्यात आला. तर अमितकुमार आणि संदीप तोमरला अनुक्रमे मंगोलिया आणि तुर्कस्तानचाही व्हिसा देण्यात आला. ही चाल म्हणजे थेट राहुल आवारेवर झालेला अन्याय असल्याची भावना महाराष्ट्राच्या कुस्ती समर्थकांमध्ये निर्माण झाली होती.
मात्र राहुल आवारेने आपल्याला ऑलिम्पिकमधून हटवलं असलं, तरी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत करुन दाखवलं.
संबंधित बातम्या