पुणे : टीम इंडियासाठी खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सलामीवीर गौतम गंभीरला पुन्हा एकदा सूर गवसला आहे. पुण्यात खेळवण्यात आलेल्या रणजी ट्रॉफीतील सेमीफायनलमध्ये त्याने पश्चिम बंगालविरुद्ध खेळताना शानदार 127 धावांची खेळी करत जुना सूर गवसला असल्याचे संकेत दिले.


नवदीप सैनी आणि कुलवंत खेजरोलियाच्या भेदक गोलंदाजीमुळे दिल्लीने बंगालचा दुसरा डाव अवघ्या 86 धावांत गुंडाळत रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. दिल्लीने तिसऱ्याच दिवशी बंगालचा एक डाव आणि 26 धावांनी पराभव केला.

गंभीरने 216 चेंडूंचा सामना करताना 21 चौकार ठोकत शतक पूर्ण केलं. या मोसमात त्याने पुन्हा एकदा जुन्या शैलीत फलंदाजी केली. मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्यातही त्याने 95 धावांची खेळी केली होती. शिवाय गेल्या महिन्यात कर्नाटकविरुद्ध 144 आणि त्यापूर्वीच्या सामन्यात 86 धावांची खेळी केली होती.

गौतम गंभीर हा अशी क्षमता असणारा फलंदाज आहे, जो कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सिद्ध करु शकतो. त्यामुळे येत्या काळात टीम इंडियात त्याचं पुनरागमन होईल, या अपेक्षा वाढल्या आहेत. आगामी काळात टीम इंडिया अनेक परदेशी दौऱ्यांवर जाणार आहे. त्यामुळे गंभीरचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला तिसऱ्या क्रमांकाचा सलामीवीर फलंदाज म्हणून संधी दिली जाऊ शकते. परदेश दौऱ्यांवर गंभीरने नेहमीच दमदार प्रदर्शन केलं आहे.

गंभीरला टीम इंडियासाठी खेळण्याची अखेरची संधी 2016 मध्ये मिळाली होती, ज्यामध्ये त्याने एक अर्धशतक ठोकलं होतं. 2014 नंतर त्याला फारशी खेळण्याची संधी मिळालेली नाही. केवळ तीन कसोटी सामन्यातच त्याने टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे.

अखरेचा वन डे सामना त्याने 2013 साली खेळला होता. एक वेळ अशी होती, जेव्हा गंभीर भारताच्या सर्वात यशस्वी सलामीवीर फलंदाजांपैकी एक मानला जायचा. त्याने 2004 साली पहिल्यांदा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर 2012 पर्यंत सलग त्याने कसोटी, वन डे आणि टी-20 हा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं.

गंभीरने आतापर्यंत 58 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे, ज्यामध्ये त्याच्या खात्यात 4 हजार 154 धावांचा समावेश आहे. यात 9 शतकं आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे. वन डेतही त्याने 40 च्या सरासरीने पाच हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे दोन वेळा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो यशस्वी खेळाडू आहे.