शहीद पोलिसाच्या मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च गौतम गंभीर उचलणार!
एबीपी माझा वेब टीम | 05 Sep 2017 10:31 PM (IST)
'जोहरा तुझे हे अश्रू जमिनीवर ढाळू नकोस, कारण मला असं वाटतं की, त्याचं वजन पेलण्याची क्षमता खुद्द पृथ्वीचीही नाही. तुझ्या शहीद पित्याला आमचा सलाम.'
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये 27 ऑगस्टला सीमेपलीकडील शत्रूशी लढताना पोलीस अधिकारी अब्दुल रशीद हे शहीद झाले. त्यानंतर शासकीय इतमामात त्यांचा दफनविधी पार पडला. पण त्यावेळच्या एका फोटोनं क्रिकेटर गौतम गंभीरही हळहळला. अब्दुल रशीद यांचा दफनविधी सुरु असतानाच त्यांची मुलगी जोहरानं एकच टाहो फोडला. त्यावेळचा तिचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिचा हा फोटो गंभीरनं आपल्या ट्विटर अकाउंटवर अपलोड केला. एवढंच नव्हे तर जोहराच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्चही उचलणार असल्याचं त्यानं जाहीर केलं. आपल्या पोस्टमध्ये गंभीर म्हणतो की, 'जोहरा तुझे हे अश्रू जमिनीवर ढाळू नकोस, कारण मला असं वाटतं की, त्याचं वजन पेलण्याची क्षमता खुद्द पृथ्वीचीही नाही. तुझ्या शहीद पित्याला आमचा सलाम.' गंभीरनं आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये जोहराच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचं जाहीर केलं. 27 ऑगस्टला अब्दुल रशीद हे सीमेपलीकडील शत्रूशी लढताना शहीद झाले होते.