नवी दिल्ली: नुकत्याच झालेल्या दुलीप करंडकातील 5 पैकी 4 सामन्यात अर्धशतक झळकावूनही टीम इंडियामधून त्याला वगळल्याने त्याने आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. आता त्याने भारतीय एकदिवसीय क्रिकेटचा कर्णधार एम.एस.धोनीवर तयार होणाऱ्या बायोपिक 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' संदर्भात मत व्यक्त करताना, क्रिकेटर्सच्या जीवनावर आधारीत तयार करण्यात येणाऱ्या बायोपिकवर आपला विश्वास नसल्याचे मत व्यक्त केलं आहे.
याशिवाय त्याने क्रिकेटपटू बायोपिक तयार करण्यासाठी पात्र नसल्याचे मतही व्यक्त केलं आहे. त्याच्या मते क्रिकेटपटूंच्या ऐवजी ज्यांनी देशाची सेवा केली, त्यांच्या जीवनावरच चित्रपट निर्माण केले जावेत अशी इच्छा त्याने व्यक्त केली.
गौतम गंभीरच्या या प्रतिक्रीयांमुळे त्याचे कर्णधार धोनीशी संबंध चांगले नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. कारण यापूर्वीही गंभीरने टीम इंडिया आणि धोनीवर टीका केली होती. नुकत्याच दिलेल्या एका प्रतिक्रीयेत त्याने कसोटी क्रिकेटचा कर्णधार विराट कोहली धोनीपेक्षा खेळाचा चांगला शेवट करत असल्याचे म्हणले होते. यावेळी त्याला 2011 मधील धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकल्याबद्दल विचारले असता, त्याने याचे श्रेय संघाला दिले होते.
गौतम गंभीरने भारतीय संघाकडून खेळताना 52 कसोटी सामन्यात 42.58च्या सरासरीने 4046 धावा केल्या. तर एकदिवसीय सामन्यात त्याने 5238 धावा ठोकल्या. याशिवाय टी20 सामन्यातही त्याने 932 धावा झळकावल्या आहेत.
संबंधित बातम्या
माझ्याकडे दुर्लक्ष झालंय, पण मी पळ काढणार नाहीः गंभीर
धोनी माझा फोनही उचलत नाहीः युवराज सिंह