मुंबई : भारताने 2011 चा विश्वचषक जिंकला तो दिवस कुणीही विसरु शकत नाही. आज दिनांक 2 एप्रिल 2018. टीम इंडियाच्या दुसऱ्या विश्वचषक विजयाला आज सात वर्षे झाली, पण भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनातल्या त्या ऐतिहासिक फायनलच्या आठवणी आजही ताज्या आहेत.


महेंद्रसिंग धोनीने नुवान कुलशेखराच्या चेंडूवर ठोकलेल्या विजयी षटकाराने टीम इंडियाच्या त्या विश्वचषक विजयावर शिक्कामोर्तब केलं. वानखेडे स्टेडियमवरच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवला होता.

अंतिम सामन्यात मोलाची भूमिका बजावणारा टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरनेही जुन्या आठवणींना उजाळा दिला.  ''2011 साली आम्ही आव्हानाला मिठीत घेत नवं आभाळ गाठलं होतं, आता 2019 कूस बदलतंय... आव्हान पुन्हा एकदा  आलिंगन देण्यासाठी सज्ज आहे आणि नवं आभाळही खुणावतंय,'' अशा शब्दात त्याने आगामी विश्वचषकासाठी युवा खेळाडूंमध्ये ऊर्जा भरली आहे.


गंभीरने 2011 चा विश्वचषक जिंकण्यासाठी मोलाची भूमिका निभावली होती. त्याने केलेल्या 97 धावांच्या खेळीने भारताला विजयाच्या जवळ नेलं. महेंद्रसिंह धोनीसोबत मोठी भागीदारी रचून त्याने विजयावर शिक्कामोर्तब केलं. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि विराट कोहली यांच्यासारखे महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर गंभीरने टिच्चून फलंदाजी केली होती.

ऐतिहासिक विजयाचा व्हिडीओ :