मुंबई: टीम इंडियामध्ये गौतम गंभीरचं तब्बल दोन वर्षानंतर पुनरागमन झालं आहे. न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी दोन बदल करण्यात आले आहेत.


पहिल्या कसोटीत दुखापतग्रस्त झालेला केएल राहुल आणि चिकनगुनियानं आधीच संघाबाहेर असलेला इशांत शर्मा यांच्या जागी गौतम गंभीर आणि हरियाणाचा फिरकी गोलंदाज जयंत यादवला संघात स्थान देण्यात आलं आहे.


कानपूर कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये राहुलने भारताला चांगली सुरुवात करुन दिली होती. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना त्याच्या डाव्या मांडीचे स्नायू दुखावले होते. त्यामुळे राहुल दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण करु शकला नव्हता.

गंभीर 2014 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. पण रणजी क्रिकेट आणि अलिकडेच झालेल्या दुलीप चषकात गंभीरने उत्कृष्ट कामगिरी बजावून टीम इंडियाचं दार ठोठावलं.

कानपूर कसोटीत भारताचा विजय

भारतानं कानपूरच्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडचा 197 धावांनी धुव्वा उडवून, आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत पाकिस्तानसह संयुक्तरित्या अव्वल स्थान मिळवलं आहे. दोन्ही संघांच्या खात्यात सध्या प्रत्येकी 111 गुण आहेत. टीम इंडियानं कोलकाता कसोटी जिंकली, तर भारताच्या खात्यात आणखी गुणांची भर पडेल आणि टीम इंडिया आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत निर्विवादरित्या नंबर वन होईल.

दरम्यान, कानपूर कसोटीत भारतीय विजयाचा शिल्पकार ठरलेल्या रवीचंद्रन अश्विननं कसोटी गोलंदाजांसाठीच्या आयसीसी क्रमवारीत एक पाऊल पुढे टाकलं आहे. या क्रमवारीत अश्विन तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर दाखल झाला आहे.