मुंबईः भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा उमेदवार निवडण्यासाठी बीसीसीआयच्या चार सदस्यांनी मुलाखती घेतल्या. यामध्ये सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली आणि संजय जगदाळे यांचा समावेश होता. मात्र माझी मुलाखत घेण्यासाठी गांगुली उपस्थितच नव्हता, असा खुलासा रवी शास्त्री यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना केला आहे.


 

 

रवी शास्त्रींची मुलाखत व्हिडिओ लिंकद्वारे संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत झाली. मुलाखत घेण्यासाठी सचिन स्काईपद्वारे लंडनहून सहभागी होता. जगदाळे आणि लक्ष्मण हे दोघे ताज हॉटेलमध्ये होते. तर गांगुली कोलकाता क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयातून सहभागी होता.

 

 

मात्र, शास्त्री यांच्या मुलाखतीवेळी गांगुली कोलकाता क्रिकेट असोसिएशनच्या एका बैठकीमध्ये होता, जी बैठक साडे 6 वाजता संपली. गांगुलीने संपूर्ण मुलाखतीत एकही प्रश्न विचारला नाही, असं शास्त्री यांनी सांगितलं.

 

 

निवड न झाल्यामुळे नाराज

प्रशिक्षकपदी निवड न झाल्यामुळे आपण नाराज असल्याचंही शास्त्री यांनी सांगितलं. भारतीय संघासोबत गेल्या 18 महिन्यांपासून भारतीय संघासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. भारतीय संघाला सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये वरचं स्थान मिळालं आहे.

 

भारतीय संघाचे खेळाडू आणि सर्व स्टाफ यांच्याशी चांगले संबंध झाले होते. भारतीय संघाला गेल्या 18 महिन्यात मिळालेल्या यशाचा अभिमान आहे, असं शास्त्री यांनी सांगितलं.