लंडन : क्रीडाप्रेमींसाठी 14 जुलै हा दिवस सुपरसंडे ठरला. इग्लंडमध्ये काल लॉर्ड्सच्या मैदानावर आयसीसी विश्वचषक 2019 चा अंतिम सामना रंगला. तर दुसरीकडे विम्बल्डनची रंगतदार फायनल पाहायला मिळाली. सुपर ओव्हर आणि सुपर टायब्रेकरवर रंगलेल्या या दोन्ही सामन्यांनी क्रीडाप्रेमींची मनं जिंकली. याचवेळी विम्बल्डन आणि आयसीसीच्या ट्विटर हॅण्डलवरील संभाषणाने आणखीच मजा आणली.


Wimbledon Final : सुपर टायब्रेकरमध्ये नोवाक ज्योकोविचची बाजी, पाचव्यांदा विम्बल्डनचं जेतेपद

विम्बल्डन जेतेपदासाठी सर्बियाच्या नोवाक ज्योकोविच आणि स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर यांच्यात लढत होती. हा सामना तब्बल पाच तास रंगला. अटीतटीच्या या सामन्यात अखेर नोवाक ज्योकोविचने बाजी मारली. त्याने सुपर टायब्रेकरवर फेडररला पराभूत करुन विम्बल्डनचं सलग दुसरं विजेतेपद पटकावलं.

तर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंडमधील सामना आधी टाय झाला. यानंतर खेळवलेल्या सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाल्याने, सर्वाधिक चौकारांच्या आधारावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. क्रिकेट विश्वाला तब्बल 23 वर्षांनी इंग्लंडच्या रुपात नवा विजेता मिळाला.

World Cup 2019 | क्रिकेटचा जन्मदाता देश पहिल्यांदाच विश्वविजेता, रोमहर्षक सामन्यात इंग्लंड विजयी

परंतु मर्यादित 50-50 षटकात सामना टाय झाल्यावर विम्बल्डनच्या ट्विटर हॅण्डलवरुन आयसीसीला उद्देशून ट्वीट करण्यात आलं. "हॅलो आयसीसी, तुम्ही तुमच्या शेवटाला कसं सामोरं जात आहात?" असं ट्वीटमध्ये म्हटलं होतं.


यानंतर आयसीसीनेही विम्बल्डनला उत्तर दिलं की, "सध्या इथे थोडीफार धावपळ आहे. तुमच्याकडे लवकरच परत येऊ."


या दोन्ही ट्विटर हॅण्डलवरील संभाषणाची चाहत्यांनी मज्जा लुटली. पण टेनिस आणि क्रिकेटमधील या सुपर सामन्याने क्रीडाचाहत्यांचा संडे सुपर झाला हे मात्र खरं.