मुंबईः टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटीला उद्यापासून पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स पार्क ओव्हलवर सुरुवात होत आहे. भारताने सेंट ल्युसियाची तिसरी कसोटी जिंकून विंडीज दौऱ्यातली चार कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशी आधीच खिशात घातली आहे.


 

विंडीज दौऱ्यातली कसोटी मालिका 3-0 ने जिंकण्याचा विराट कोहली आणि त्याच्या सहकाऱ्यांचा निर्धार आहे. तिसऱ्या कसोटीसाठी संधी देण्यात आलेला रोहित शर्मा याही कसोटीत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. या परिस्थितीत विराट कोहली पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी उतरणं पसंत करेल, असा अंदाज आहे.

 

विंडीज दौऱ्यात एकच मोठी खेळी करू शकलेल्या शिखर धवनऐवजी मुरली विजयला अंतिम संघात स्थान मिळू शकतं. टीम इंडिया याही कसोटी पाच गोलंदाजांसह खेळण्याची रणनीती कायम राखण्याची शक्यता आहे. पण ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांच्यापैकी एकाला विश्रांती मिळू शकते. तसं झालं तर उमेश यादव किंवा शार्दूल ठाकूरला चौथ्या कसोटीत खेळण्याची संधी मिळेल.