सिडनी: बॉल टॅम्परिंगप्रकरणामुळे जगभरातून टीका झालेला ऑस्ट्रेलिया संघ अजूनही सावरलेला नाही. आयसीसीने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर, कॅमरुन बॅनक्रॉफ्ट आणि कर्णधारपद गमावलेल्या स्टीव्ह स्मिथवर बंदी घातली आहे.


विस्कळीत झालेली संघाची घडी पुन्हा बसवण्यासाठी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क सरसावला आहे.

पुन्हा टीममध्ये येण्याची इच्छा

मायकल क्लार्कने पुन्हा ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी फुकटात ऑस्ट्रेलियाकडून खेळण्यास तयार आहे, असा प्रस्ताव त्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिला आहे.

बॉल टॅम्परिंगमुळे बिथरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाला पुन्हा मार्गावर आणण्यासाठी क्लार्कने हा प्रस्ताव दिला.

ऑस्ट्रेलियासाठी सर्व काही करण्यास तयार

37 वर्षीय क्लार्कने संडे टेलीग्राफच्या मुलाखतीत, आपण ऑस्ट्रेलियासाठी सर्व काही करण्यास तयार असल्याचं सांगितलं.

क्लार्क म्हणाला, “वय हे केवळ एक वर्ष असतं. मी वयाची काळजी करत नाही. ब्रॅड हॉग 45 व्या वर्षापर्यंत खेळत होता. त्यामुळे वयावर नव्हे तर तुमची प्रतिभा आणि निष्ठा यावर अवलंबून असतं.

मी माझं मत क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड यांना मेसेजद्वारे कळवलं आहे, मात्र अद्याप त्यांचं उत्तर आलेलं नाही”.

क्लार्कची निवृत्ती

मायकल क्लार्कने 2015 मध्ये 115 व्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. क्लार्कने कसोटीत 48.33 च्या सरासरीने 8643 धावा केल्या आहेत.

क्लार्कच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलियाने 2015 मध्ये क्रिकेट वर्ल्डकप विजयाला गवसणी घातली.