FIFA World Cup 2022: येत्या 20 नोव्हेंबर फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. फुटबॉलच्या या मोठ्या स्पर्धेपूर्वी अर्जेंटिनाच्या संघाला (Argentina Football Team) मोठा धक्का लागलाय. संघाचे दोन स्टार खेळाडू निकोलस गोन्झालेझ (Nicolas Gonzalez) आणि जोकिन कोरिया (Joaquin Correa) यांना दुखापतीमुळं फिफा विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडावं लागलंय.र्जेंटीना फुटबॉल एसोसिएशन (AFA) ने या गोष्टीची माहिती दिली आहे. दुसरीकडं सेनेगल फुटबॉल संघाचा महत्वाचा खेळाडू सादियो माने (Sadio Mane) यालाही दुखापतीमुळं स्पर्धेला मुकावं लागलंय. 


स्टार फुटबॉलपटू निकोलस गोन्झालेझ आणि जोकिन कोरिया यांचं स्पर्धेबाहेर होणं, अर्जेंटिनाच्या संघासाठी मोठा झटका मानला जातोय. आधीच अर्जेंटिनाचा संघ डिफेंडर क्रिस्टन रोमेरो, फॉरवर्ड प्लेयर अलेजांद्रो गोमेझ आणि पाउलो डिबेला यांच्या फिटनेसशी झुंजत आहे. हे तिन्ही खेळाडू 16 नोव्हेंबरला अर्जेंटिनाच्या सराव सामन्यातही दिसले नव्हते.


अर्जेंटिनाचा  44 वर्षांचा दुष्काळ संपणार का?
अर्जेंटिनानं शेवटचा विश्वचषक 1978 मध्ये जिंकला होता. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात त्यांनी पश्चिम जर्मनीला पराभवाची धुळ चारली होती. तेव्हापासू म्हणजेच 44 वर्षांपासून अर्जेंटिनाच्या संघाला विश्वचषक जिंकता आला नाही. दरम्यान, दोनदा अर्जेंटिनाचा संघ विजेतेपदाच्या अगदी जवळ पोहचला होता. मात्र अंतिम फेरीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. 1990 मध्ये पश्चिम जर्मनी आणि 2014 मध्ये जर्मनीनं अर्जेंटिनाचा अंतिम फेरीत पराभव केला. 


अर्जेंटिनाच्या ग्रुपमधील इतर संघ
या स्पर्धेत अर्जेंटिनाच्या संघाचा सी ग्रुपमध्ये समावेश करण्यात आलाय. अर्जेंटिना व्यतिरिक्त या ग्रुपमध्ये साऊदी अरब, मॅक्सिको, पोलँड हे देश देखील आहेत. अर्जेंटिना 22 नोव्हेंबरला सौदी अरेबियाविरुद्धच्या सामन्यानं विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल. यानंतर त्याला मेक्सिको आणि पोलंडचा सामना करावा लागणार आहे. म्हणजेच या गटातील स्पर्धा चुरशीची आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरतील. फिफा क्रमवारीत अर्जेंटिनाचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. या संघानं गेल्या वर्षी कोपा अमेरिका चषकावर नाव कोरलं होतं. यावेळी मेस्सी त्याच्या शेवटच्या विश्वचषकात अर्जेंटिनाचा 44 वर्षांचा दुष्काळ संपवेल, अशी अपेक्षा आहे.


अर्जेंटिनाचा संघ संपूर्ण संघ:
गोलकीपर्स: एमिलियानो मार्टिनेझ, फ्रँको अरमानी, जेरोनिमो रुल्ली
डिफेन्डर्स: गोन्झालो मॉन्टिएल, नहुएल मोलिना, जर्मन पाजेला, क्रिस्टियन रोमेरो, निकोलस ओटामेंडी, लिसांड्रो मार्टिनेझ, जुआन फॉयथ, निकोलस टेग्लियाफिको, मार्कोस अकुना.
मिडफील्डर्स: लिएंड्रो परेदेझ, गुइडो रॉड्रिग्ज, एन्झो फर्नांडेझ, रॉड्रिगो डी पॉल, एक्सक्वेल पॅलासिओस, अलेजांद्रो गोमेझ, अॅलेक्सिस मॅक अॅलिस्टर.
फॉरवर्ड्स: पाउलो डिबेला, लिओनेल मेस्सी, एंजल डी मारिया, निकोलस गोन्झालेझ (स्पर्धेबाहेर), जोकिन कोरिया (स्पर्धेबाहेर), लॉटारो मार्टिनेझ, ज्युलियन अल्वारेझ.


हे देखील वाचा-