Euro Cup 2024: यूरो कप 2024 च्या स्पर्धेत नेदरलँड आणि तुर्की यांच्यात सामना झाला. या सामन्यात नेदरलँड्सने तुर्कीचा 2-1 असा पराभव करत युरोपियन चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले.
आता उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे. पहिला उपांत्य फेरीचा सामना स्पेन आणि फ्रान्स यांच्यात होणार आहे. तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना नेदरलँड आणि इंग्लंड यांच्यात रंगणार आहे.
स्वित्झर्लंडविरुद्ध इंग्लंडचा विजय-
इंग्लंडने उपांत्यपूर्व फेरीत स्वित्झर्लंडचा पेनल्टीद्वारे पराभव केला. सामना 1-1 अशा बरोबरीत होता. यानंतर इंग्लंडने स्वित्झर्लंडचा शूटआऊटमध्ये 5-3 असा पराभव केला. ट्रेंट अलेक्झांडर-अरनॉल्डने निर्णायक गोल करत इंग्लंडला उपांत्य फेरीचं तिकीट मिळवून दिलं.
स्पेनचा जर्मनीवर विजय-
मायकल मेरिनो याने अतिरिक्त वेळेत अखेरच्या क्षणी गोल नोंदविल्याने स्पेनने रोमहर्षक उपांत्य सामन्यात यजमान जर्मनीवर 2-1 असा विजय नोंदवीत युरो चषकाची उपांत्य फेरी गाठली. दोन्ही संघ निर्धारित वेळेत 1-1 असे बरोबरीत होते. सामना पेनल्टी शूटआउटकडे सरकला तेव्हा बदली खेळाडू मेरिनो याने 119 मिनिटाला गोल नोंदवून संघाला विजय मिळवून दिला. मेरिनोने गोल केल्यानंतर चाहत्यांची जुनी आठवण ताजी झाली. त्याचे वडील मिगुएल मेरिनो यांनीही 1991 मध्ये यूएफा कपमध्ये याच मैदानात गोल केला होता. ती आठवण सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केली आहे. या सामन्यात जे तीन गोल झाले ते सर्व गोल बदली खेळाडूंनी केले.