मुंबई : न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. पराभवाचं खापर कर्णधार विराट कोहलीने फलंदाजांवर फोडलं. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीही यानंतर निशाण्यावर आला. धोनीने संथ गतीने 49 धावा केल्या.


धोनीच्या या खेळीनंतर त्याच्या संघातील समावेशाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. क्रिकेट विश्वात धोनीची उणीव भरुन काढणारा खेळाडू मिळणं अशक्य आहे. मात्र टीम इंडियात त्याची जागा घेण्यासाठी काही स्टार खेळाडू वेटिंग लिस्टमध्ये आहेत. विशेषतः टी-20 मध्ये काही युवा खेळाडू असे आहेत, जे धोनीची उणीव भासू देणार नाहीत.

दिनेश कार्तिक –

धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याच्या अगोदरपासून दिनेश कार्तिक टीम इंडियासाठी खेळत आहे. भारताच्या पहिल्या टी-20 सामन्यातील विजयातही दिनेश कार्तिकचा मोठा वाटा होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून तो फॉर्मात नसल्यामुळे संघात स्थान मिळवू शकला नाही. मात्र टी-20 संघात धोनीची जागा घेणाऱ्या खेळाडूंमध्ये कार्तिकचं नाव सर्वात अगोदर येईल. कारण आयपीएलमध्येही त्याने चांगली कामगिरी केलेली आहे. 10 टी-20 सामन्यात कार्तिकने 21 च्या सरासरीने आणि 126 च्या स्ट्राईक रेटने धावा ठोकल्या आहेत. टी-20 क्रिकेटमधील 20 अर्धशतकं ठोकणाऱ्या दिनेश कार्तिककडे फलंदाजीची क्षमता असल्याचं सिद्ध होतं.

रिद्धीमान साहा –

कसोटी क्रिकेटमध्ये धोनीची जागा घेणाऱ्या रिद्धीमान साहाला अजून टी-20 मध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. मात्र आयपीएलमधील त्याची खेळी सर्वांनाच माहित आहे. आयपीएलच्या फायनलमध्ये शतक ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. 164 टी-20 सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत 14 अर्धशतकं आणि 1 शतक ठोकलं आहे.

केदार जाधव –

केदार जाधव 8 वर्ष टी-20 क्रिकेट खेळल्यानंतर केदार जाधवने भारतीय संघात पदार्पण केलं. आयपीएलमध्ये त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी विकेटकीपर म्हणून भूमिका पार पाडली आहे. शिवाय संघात एक चांगला फलंदाज म्हणूनही स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याच्या नावावर 1 अर्धशतक आहे, तर टी-20 क्रिकेटमध्ये 8 अर्धशतकं त्याच्या खात्यात जमा आहेत.

केएल राहुल –

भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणारा सलामीवीर फलंदाज केएल राहुल पार्ट टाईम विकेटकीपर म्हणून चांगलं उदाहरण आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी त्याने यष्टीरक्षक म्हणून भूमिका पार पाडली आहे. फलंदाजीमध्ये सक्षम असलेला केएल राहुल भारतासाठी नवा विकेटकीपर म्हणून पुढे येऊ शकतो.

ऋषभ पंत –

भारताच्या युवा खेळाडूंमध्ये ऋषभ पंत हा विकेटकीपर आणि फलंदाज म्हणून उत्कृष्ट खेळाडू आहे. वयाच्या 20 व्या वर्षीच त्याने क्रिकेटमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आयपीएलमध्ये त्याने खेळातील चुणूक दाखवून दिलीच आहे, पण त्याला आता भारतीय संघात प्रतिनिधित्व करण्याची प्रतीक्षा आहे.