रशिया : रशियात सुरु असलेला फिफा वर्ल्डकप सध्या रोमांचक स्थितीत आहे. कारण ग्रुप स्टेजमधील मॅचेस संपल्या असून आता बाद फेरीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच लायनल मेसी, ख्रिस्तियानो रोनाल्डो तसंच नेमारसारख्या स्टार खेळाडूंवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.


वर्ल्डकपच्या नियमानुसार, क्वार्टर फायनलच्या अगोदर एखाद्या खेळाडूला जर दोनदा यलो कार्ड दाखवण्यात आले असेल तर त्या खेळाडूवर पुढच्या एका सामन्यासाठी निलंबनाची कारवाई होईल. तसंच जर खेळाडूला क्वार्टर फायनलमध्ये यलो कार्ड दाखवण्यात आलं तर त्या खेळाडूला सेमीफायनल सामना खेळता येणार नाही. या नियमांमुळेच अनेक मोठ्या खेळाडूंवर निलंबनाची टांगती तलवार आहे.

याआधीच्या सामन्यांत यलो कार्ड मिळालेले स्टार खेळाडू

यलो कार्ड मिळालेल्या यादीत अर्जेंटीनाचा लोकप्रिय खेळाडू लायनल मेसीचाही समावेश आहे. नायजेरियाविरूद्धच्या सामन्यात वेळ वाया घालवल्यामुळे मेसीला यलो कार्ड दाखवण्यात आले होते.

ख्रिस्तियानो रोनाल्डो या पोर्तुगालच्या मॅचविनर खेळाडूवरही निलंबनाच्या कारवाईची टांगती तलवार आहे. रोनाल्डोला इराणच्या डिफेंडरला धक्का मारल्यामुळे यलो कार्ड दाखवण्यात आले. तर ब्राझीलच्या नेमारलाही आतापर्यंत एक यलो कार्ड दाखवण्यात आलं आहे.

त्यामुळे निलंबनाची कारवाई टाळायची असेल तर या खेळाडूंना आपल्या आगामी सामन्यात शिस्तबद्ध खेळ करुन यलो कार्ड मिळण्यापासून स्वत:ला वाचवावे लागेल. अन्यथा बाद फेरीतील महत्वाच्या सामन्याला या स्टार खेळाडूंना मुकावे लागणार आहे.