मॉस्को: फिफा विश्वचषकातील सलग दुसऱ्या सामन्यात रशियाने इजिप्तवर 3-1 ने मात केली. विश्वचषकातील सलग दोन सामने जिंकण्याची रशियाची ही पहिलीच वेळ आहे.

या विजयासह 6 गुण कमावत रशिया अ गटात अव्वल स्थानावर आहे.

सामन्याच्या पूर्वार्धापर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. मात्र, इजिप्तचा कर्णधार अहमद फतीने 47 व्या मिनिटाला स्वयंगोल केला. त्यामुळे रशियाला 1-0 अशी आघाडी मिळाली.

नंतर रशियाच्या डेनिस चेरीशेव्हने 59 व्या मिनिटाला तर आर्टम झ्युबाने 62 व्या मिनिटाला गोल केला. या दोन्ही गोलने रशियाला 3-0 अशी विजयी आघाडी मिळवून दिली.

या सामन्यात सर्वांचं लक्ष इजिप्तच्या मोहम्मद सलाहकडे लागलं होतं. मात्र त्याला या सामन्यात चमकदार कामगिरी करता आली नाही.

सलाहने 73 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर पहिला गोल मारला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

1990 नंतर रशिया विश्वचषकात पहिल्यांदाच खेळत आहे. या विश्वचषकात रशियाने सलग दोन सामन्यात विजय मिळवला. यापूर्वी रशियाने पहिल्या सामन्यात सौदी अरेबियावर 5-0 असा मोठा विजय मिळवला होता.