मॉस्को : थियागो सिल्व्हाच्या ब्राझिलने फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. ब्राझिलने मेक्सिकोचा 2-0 ने पराभव केला.
या सामन्यात स्टार फुटबॉलवीर नेमार ज्युनियर ब्राझिलच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने विलियनच्या पासवर 51 व्या मिनिटाला गोल डागून ब्राझिलचं खातं उघडलं. नेमारच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतला हा 51 वा गोल ठरला.
रॉबर्टो फर्मिनोनं ब्राझिलला दुसरा गोल झळकावून दिला. रॉबर्टो फर्मिनोसाठी ही कामगिरी नेमारच्या पासनं सोपी ठरवली.
पाच वेळा विश्वचषक विजेत्या ब्राझिलचा सामना शुक्रवारी जपान किंवा बेल्जियमशी होईल.
ब्राझिल आणि मेक्सिको आतापर्यंत पाच वेळा विश्वचषकात आमनेसामने आले आहेत. मात्र मेक्सिकोला आतापर्यंत एकदाही ब्राझिलविरोधात गोल झळकवता आलेला नाही.
ब्राझिलचा हा विश्वचषकातील 227 वा गोल आहे. विश्वचषकात सर्वाधिक गोल झळकवण्याचा जर्मनीचा विक्रम ब्राझिलने या सामन्यात मोडित काढला.