मुंबई : “सिडकोच्या 24 एकर जागेबाबत काँग्रेसने केलेले आरोप खोटे असून पृथ्वीराज चव्हाण आणि संजय निरुपम यांच्यासह काँग्रेस पक्षावर 500 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे ,” असं म्हणत भाजप आमदार प्रसाद लाड यांनी काँग्रेसच्या आरोपांना उत्तर दिले आहे.

नवी मुंबईतील सिडकोच्या 24 एकर जागेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रसाद लाड यांनी मोठा घोटाळा केल्याचा आरोप आज काँग्रेसने केला होता. आरोपानंतर तासाभरातच भाजप प्रवक्ते माधव भांडारी आणि आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून 1767 कोटींची जमीन 3 कोटीत बिल्डरला : काँग्रेस

‘सध्याच्या रेडीरेकरनुसार सिडकोच्या जमिनीची किंमत 5 कोटी 69 लाख एवढी आहे. त्यामुळे सतराशे कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करणं हा एक विनोद आहे’, असं भाजपचं म्हणणं आहे. तसंच ‘प्रकल्पग्रस्तांना जमिनीचे वाटप जिल्हाधिकारी करत असतात, त्यामुळे याबाबत मुख्यमंत्र्यांवर घोट्याळ्याचा आरोप करणं  हास्यास्पद आहे,’ असं म्हणत भांडारींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

“संजय निरुपम हे भरकटलेले नेते आहेत. मनिष भतिजा, भालेराव यांच्याशी मैत्री आहे पण जे फोटो दाखवले त्यावरुन ते माझे पार्टनर आहेत, असं सिद्ध होत नाही”, असं स्पष्टीकरण प्रसाद लाड यांनी दिले आहे.

सिडकोच्या ताब्यातील जागेची किंमत तब्बल एक हजार 767 कोटी रुपये असताना ती फक्त तीन कोटी रुपयांत बिल्डर मनिष भतिजा आणि संजय भालेराव यांना विकण्यात आली, असा आरोप काँग्रेसने केला आहे.