रशिया : 2018 फिफा विश्वचषकाचं बिगुल वाजलं. या विश्वचषकात सर्वच संघ एकास एक सव्वाशेर आहे. आज विश्वचषकाच्या तिसऱ्या दिवशी 4 सामने खेळले जाणार आहेत.


दुपारी 3.30 वाजता ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स यांचा सामना होणार आहे. संध्याकाळी 6.30 वाजता अर्जेटिना आणि आईसलँड हे संघ एकमेकांना भिडणार आहेत. रात्री 9.30 वाजता पेरू विरुद्ध डेन्मार्क हा सामना होणार आहे. तर मध्यरात्री 12.30 क्रोएशिया आणि नायजेरिया यांचा मुकाबला होणार आहे. परंतु या सर्व सामन्यात संपूर्ण फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागले आहे ते अर्जेटिना आणि आईसलँडकडे.

कजान - ऑस्ट्रेलियासमोर आज फ्रान्सचे कठीण आव्हान आहे. पात्रता सामन्यात आपली छाप पाडणारा फ्रान्सचा संघ आज फिफा विश्वचषक 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात फ्रान्सचा संघ ऑस्ट्रेलियाला कडवं आव्हान देणार एवढं नक्की. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता होणार आहे.

माॅस्को – आईसलँडविरुद्ध मोठ्या विजयाच्या निर्धारानेच फुटबॉलचा सुपरस्टार लायनेल मेस्सीचा अर्जेंटिनाचा संघ यंदाच्या विश्वचषक पदार्पण करत आहे. मेस्सीला आपल्या देशाला अद्यापही विश्वचषक जिंकून देता आले नाही. गतउपविजेत्या अर्जेटिनाचे पारडे या सामन्यात नक्कीच जड राहणार आहे. आईसलँड तसा कमकुवत मानला जात असला तरी पदार्पणातच छाप पाडण्यासाठी आईसलँडचा संघ उत्सुक आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता होणार आहे.

सारान्स्क- बऱ्याच वर्षांनी विश्वचषकात कमबॅक केरणारा पेरूचा संघ डेन्मार्कला भिडणार आहे. डेन्मार्कच्या स्टार मिडफील्डर क्रिस्टियन एरिक्सनचा सामना पेरूला करावा लागणार आहे. पेरू आणि डेन्मार्कचा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता होणार आहे.

कॅलिनइनग्राद- क्रोएशिया आणि नायजेरियामध्ये अटीतटीचा सामना होणार असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही संघ या सामन्यात जिंकण्यासाठीच मैदानावर उतरणार आहेत. तसेच ड गटात अर्जेटिना आणि आईसलँडचा देखील सामावेश आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 12.30  वाजता खेळला जाणार आहे.