मॉस्को : यजमान रशियाचं फिफा विश्वचषकातलं आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं. क्रोएशियानं रशियाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 असा पराभव करुन विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

क्रोएशियाने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याची गेल्या वीस वर्षांमधली ही दुसरीच वेळ आहे. क्रोएशियाने याआधी 1998 साली उपांत्य फेरीत खेळण्याचा मान मिळवला होता.

रशियाकडून डेनिस चेरिशेव्ह आणि मारियो फर्नांडेस, तर क्रोएशियाकडून क्रॅमरिच आणि विडानं यांनी प्रत्येकी एक-एक गोल झळकावला. क्रोएशिया आणि रशिया संघांमधला उपांत्यपूर्व सामना निर्धारित वेळेत 1-1 असा आणि मग जादा वेळेत 2-2 असा बरोबरीत सुटला.

रशिया-क्रोएशिया सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटवर ठरवण्यात आला. त्यात क्रोएशियाचा गोलरक्षक डॅनियल सुबासिचनं रशियाच्या स्मोलोव्हची पहिलीच पेनल्टी थोपवली.

ब्रोझोविचनं पहिल्याच पेनल्टीवर गोल करुन क्रोएशियाला आघाडी मिळवून दिली. पण रशियाचा गोलरक्षक इगोर अकिनफिव्हनं क्रोएशियाच्या कोवासिचची दुसरी पेनल्टी रोखून सामन्यात पुन्हा चुरस निर्माण केली.

त्या परिस्थितीत रशियाच्या मारियो फर्नांडेसनं चेंडू गोलपोस्टच्या बाहेर मारुन पेनल्टी वाया दवडली आणि क्रोएशियाला सनसनाटी विजय साजरा करण्याची संधी मिळाली.

क्रोएशियाकडून मॉडरिच, विडा आणि रॅकिटिच यांनी ओळीनं पेनल्टी शूटआऊटमध्ये अचूक गोल मारला आणि आपल्या संघाला 3-2 असा विजय मिळवून दिला.