मुंबई : मुंबईसह राज्यभरातीन अनेक भागांत कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईतील अंधेरी, कुर्ला, सायन, दादर भागात सकाळपासून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसामुळे मुंबईतल्या प्रमुख रस्त्यांवरची वाहतूक संथगतीनं सुरु आहे. मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातही जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत.


LIVE UPDATES


8.19AM : मुंबई : घाटकोपर पूर्व-पश्चिम भागाला जोडणारा ब्रिज बंद, खालच्या बाजूने ब्रिज झुकल्याचा अंदाज, खबरदारीसाठी ब्रिज बंद करण्याचा निर्णय


10.01 AM : वसई पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा जुना अंबाडी पूल आजपासून डागडुजीसाठी अनिश्चित काळासाठी बंद, सर्व वाहतूक बाजुच्याच नवीन ब्रिजवरुन होणार


11.13 AM : पुणे : सिंहगड घाटात दरड कोसळली, वनविभागाकडून घाट रस्त्यावरील वाहतूक बंद


मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या नक्की कमी आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता कमी आहे.


पालघरमध्येही मुसळधार पाऊस
पालघरमध्ये तुफान पाऊस सुरु असल्यानं जव्हार विक्रमगड रस्त्यावरील साखरे पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे नाशिक-जव्हारहून विक्रमगड आणि पालघरकडे जाणारी वाहतूक बंद आहे. दहर्जे नदीला मोठा पूर आल्यामुळे कुर्झे येथील पुलावर पाणी आलं आहे. तर भिवंडी शहरात मुसळधार पावसामुळे कामवारी नदीला पूर आला आहे. नदीनाका येथील भिवंडी वाडा रस्त्यावरील  वाहतुक बंद झाली आहे.


कोकणातही पावसाची जोरदार बटिंग
कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांना पावसानं झोडपलं आहे. कुडाळच्या माणगाव खोऱ्यातील नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्याने अंबेरी पुलावरुन पाणी वाहत आहे. पुलावरुन पाणी वाहत असल्यानं 27 गावांचा संपर्क तुटला असून, या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.


खेडमध्ये जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. सावित्री नदी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.


साताऱ्यात कोयना नदील पूर
सातारा जिल्ह्यातल्या सातारा शहर, महाबळेश्वर, कोयना भागात मुसळधार पाऊस बरसत आहे. या भागांमधील नदी, नाले, ओढ्यांना पूर आला आहे. सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे कोयना नदीला पूर आला आहे. महाबळेश्वरचा वेण्णा तलावही ओसंड़ून वाहत आहे. सातारकरांची तहान भागवणारा सातारचा कास तलाव तुडूंब भरला आहे.