मॉस्को (रशिया): पाच वेळचा विजेता ब्राझील आणि स्वित्झर्लंड यांच्यातील सामना 1-1 बरोबरीत राहिला.
नेमार खेळला, तरीही नेमारच्या ब्राझीलला स्वित्झर्लंडनं विश्वचषक सामन्यात 1-1 असं बरोबरीत रोखण्याचा पराक्रम गाजवला.
या सामन्यात फिलिप कुटिन्होनं विसाव्या मिनिटालाच ब्राझीलचं खातं उघडलं. त्यानं स्विस बचावपटूंना चकवून, मारलेल्या किकनं चेंडू गोलरक्षक यान सॉमरलाही पुरता मामा बनवून गोलपोस्टमध्ये गेला.
ब्राझीलनं 1-0 अशी आघाडी मध्यंतरापर्यंत टिकवली. पण उत्तरार्धात पन्नासाव्या मिनिटाला स्टीव्हन झुबेरनं स्वित्झर्लंडला बरोबरी साधून दिली.
झुबेरला एकटं सोडण्याची चूक ब्राझिलला भोवली. त्यानं हेडरवर चेंडूला गोलपोस्टची नेमकी दिशा दिली. त्यामुळे स्वित्झर्लंडने ब्राझीलशी बरोबरी केली.
ब्राझील-स्वित्झर्लंड सामना बरोबरीत सुटल्यानं, ई गटात सर्बियानं एका विजयासह अव्वल स्थान राखलं आहे.
दुखापतीनंतर नेमार मैदानात
रशियातल्या फिफा विश्वचषकात काल साऱ्यांच्या नजरा ब्राझीलच्या कामगिरीकडे खिळल्या होत्या. फुटबॉलविश्वातला सर्वात लोकप्रिय संघ अशी ब्राझीलची ओळख आहे.
ब्राझीलच्या चाहत्यांसाठी खूशखबर होती की, नेमार स्वित्झर्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात मैदानात उतरणार होता. फेब्रुवारीत पॅरिस सेंट जर्मेन क्लबकडून खेळताना नेमारच्या उजव्या पायाचं हाड मोडलं होतं. त्याच्या या दुखापतीवर मार्च महिन्यात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्या दुखापतीतून सावरलेला नेमार विश्वचषकात कशी कामगिरी बजावतो, याविषयी त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. मात्र नेमारला सलामीच्या सामन्यात आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आलं.
गतविजेत्या जर्मनीचा सलामीच्या सामन्यात पराभव
गतविजेत्या जर्मनीला रशियातल्या फिफा विश्वचषकात सलामीलाच खळबळनजक पराभवाला सामोरं जावं लागलं. फ गटातल्या या सामन्यात मेक्सिकोनं जर्मनीचा १-० असा पराभव केला.
संबंधित बातम्या
FIFA World Cup 2018 : गतविजेत्या जर्मनीचा सलामीच्या सामन्यात पराभव
FIFA World Cup 2018 : सर्बियाची कोस्टा रिकावर मात