समालोचकाच्या चाणाक्ष नजरेमुळे बॉल टॅम्परिंगची घटना उघड!
एबीपी माझा वेब टीम | 28 Mar 2018 09:08 AM (IST)
'आम्ही कॅमेरामनला सांगितलं की, ते लोकं चेंडूवर नक्कीच काहीतरी लावत आहेत. कारण गवत असलेल्या खेळपट्टीवर एवढ्या लवकर चेंडू रिव्हर्स स्विंग होत नाही. ही काही पाकिस्तानी खेळपट्टी नाही की जिथे प्रत्येक सेंटीमीटरवर चिरा असतील.'
केपटाऊन : ऑस्ट्रेलियाच्या बॉल टॅम्परिंगमुळे सध्या क्रिकेट जगतात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. आयसीसीने स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एका कसोटीची बंदीही घातली आहे. तर ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डानेही याप्रकरणी त्यांना दोषी ठरवलं आहे. मैदानातील बॉल टॅम्परिंगचा सर्व प्रकार दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज आणि तिसऱ्या कसोटीत समालोचन करणाऱ्या फॅनी डिव्हिलियर्सने उघड केला आहे. कॅमेरा क्रूच्या साथीने त्यांनी ऑस्ट्रेलिया खेळाडूंचं कृत्य उघड केलं. गवत असलेल्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना नव्या चेंडूने रिव्हर्स स्विंग मिळत होता. त्यामुळे फॅनी डिव्हिलियर्सला त्याबाबत बरीच शंका आली. मैदानात काही तरी गडबड सुरु आहे. असं सांगत त्याने कॅमेरा क्रूला सतर्क राहण्याचा सल्ला दिला. त्यानंतर कॅमेरामन जोटानी ऑस्कर याने आपल्या कॅमेऱ्यात बॅनक्रॉफ्ट बॉलशी टेम्परिंग करत असल्याचं अचूक टिपलं आणि इथेच ऑस्ट्रेलियाचा पर्दाफाश झाला. या सर्व प्रकाराबाबत बोलताना डिव्हिलियर्स म्हणाला की, 'आम्ही कॅमेरामनला सांगितलं की, ते लोकं चेंडूवर नक्कीच काहीतरी लावत आहेत. कारण गवत असलेल्या खेळपट्टीवर एवढ्या लवकर चेंडू रिव्हर्स स्विंग होत नाही. ही काही पाकिस्तानी खेळपट्टी नाही की जिथे प्रत्येक सेंटीमीटरवर चिरा असतील.' डिव्हिलियर्सच्या मते, हा सर्व प्रकार उघड करण्यासाठी कॅमेरा क्रूला तब्बल एक तास डोळ्यात तेल टाकून ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर नजर ठेवावी लागली. त्यानंतर हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. संपूर्ण कॅमेरा क्रूचं हे कौशल्य आहे. त्यांनी आपली कामगिरी अचूकपणे बजावली. संबंधित बातम्या : VIDEO : स्टीव्ह स्मिथवर आजीवन बंदी घाला : संदीप पाटील