रांची : टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीची क्रेझ सर्व वयोगटातील चाहत्यांमध्ये आहे. धोनीच्या संयतपणाची उदाहरणं अनेक वेळा दिली जातात. अशाचप्रकारे रांचीमध्ये पाठलाग करणाऱ्या तरुणीला न हटकता धोनीने शांतपणे सेल्फी काढू दिला.

न्यूझीलंडमधील चौथा वनडे सामना गमावल्यानंतर माही तणावाखाली होता. रांचीतील घरातून विमानतळाच्या दिशेने धोनी निघाला होता. त्यावेळी आराध्या नावाच्या एका तरुणीने स्कूटीवरुन त्याच्या हमर गाडीचा पाठलाग सुरु केला.

अर्ध्या रस्त्यातच आराध्याने धोनीला गाठलं आणि धोनीच्या नावाचा जयघोष सुरु केला. धोनीने आपल्या चाहतीची हाक ऐकली. विशेष म्हणजे त्याने आपल्या सुरक्षारक्षकांना तिला घेऊन येण्यास सांगितलं.

खुद्द धोनीनेच पाचारण केल्याने आराध्याचा आनंदही गगनात मावेनासा झाला. लाडक्या क्रिकेटपटूला भेटल्याचा क्षण कॅमेरात कैद करण्याचा मोह तिला आवरला नाही. तिने धोनीसोबतची आपली छबी कॅमेरात टिपली आणि हाच सेल्फी सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

https://twitter.com/bhavya_bhayani/status/794200748561199104