बर्मिंगहॅम: इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाचा 40 धावांनी धुव्वा उडवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अ गटात सलग तिसरा आणि अखेरचा सामनाही जिंकला. इंग्लंडच्या या विजयानं ऑस्ट्रेलियाचं चॅम्पियन्स ट्रॉफीतलं आव्हान साखळीतच संपुष्टात आलं, तर बांगलादेशला उपांत्य फेरीचं तिकीट मिळवून दिलं.


इंग्लंडनं सलग तीन विजयांसह सहा गुणांची कमाई करून गटात अव्वल स्थान मिळवलं. बांगलादेशनं तीन सामन्यांमधून तीन गुणांसह गटात दुसरं स्थान राखलं. दरम्यान, बर्मिंगहॅमच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं 50 षटकांत नऊ बाद 277 धावांची मजल मारली होती. त्यामुळं इंग्लंडसमोर विजयासाठी 278 धावांचं आव्हान होतं.

बेन स्टोक्सच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडनं 40 षटकं आणि दोन चेंडूंत चार बाद 240 धावांची मजल मारली होती. त्याच वेळी आलेल्या पावसानं खेळ थांबवावा लागला आणि डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडला 40 धावांनी विजयी घोषित करण्यात आलं. स्टोक्सनं 109 चेंडूंत 13 चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 102 धावांची खेळी केली.