नागपूर : कर्णधार विराट कोहलीच्या टीम इंडियासाठी इंग्लंडविरुद्धचा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना हा अतिशय प्रतिष्ठेचा बनला आहे. नागपूरच्या नव्या व्हीसीए स्टेडियमवरचा हा सामना गमावला, तर भारतीय संघावर गेल्या पंधरा महिन्यांमध्ये पहिल्यांदाच मायदेशातली एखादी मालिका गमावण्याची वेळ येईल.
याआधी ऑक्टोबर 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेनं भारत दौऱ्यातली वन डे सामन्यांची मालिका 3-2 अशी जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. इयॉन मॉर्गनच्या इंग्लंडनं तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला होता. त्यामुळे नागपूरचा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना जिंकून मालिकेतलं आव्हान कायम राखण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यासाठी आपल्या संघबांधणीचा आणि रणनीतीचा नव्यानं विचार करावा लागेल, असं जाणकाराचं मत आहे. कानपूरच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी भारताच्या रथीमहारथीच्या बॅटला वेसण घालण्यात यश मिळवलं होतं. त्यामुळे विराट कोहलीला युवराज सिंगच्या फलंदाजीचा क्रमांक, मनीष पांडेचा सहावा क्रमांक आणि लोकेश राहुलचा फॉर्म या तीन बाबींचा प्रामुख्यानं पुनर्विचार करावा लागेल.
कानपूरच्या सामन्यात यजुर्वेंद्र चहलच्या लेग स्पिनसमोर इंग्लंडच्या फलंदाजांची पंचाईत झाली. पण इंग्लंडच्या फलंदाजांना रोखण्यासाठी चहल आणि भारतीय गोलंदाजांच्या पाठीशी पुरेशा धावांचं संरक्षण नव्हतं. त्यामुळे नागपूरचा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना जिंकण्यासाठी भारतीय फलंदाजांना आपल्या कामगिरीत मोठी सुधारणा करावी लागणार आहे.