लंडन : विराट कोहलीची टीम इंडिया ओव्हलच्या पाचव्या कसोटीत संकटात सापडली आहे. या कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात 332 धावांची मजल मारली. त्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर भारताची सहा बाद 174 अशी घसरगुंडी उडाली आहे.

दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी, हनुमा विहारी 25, तर रवींद्र जाडेजा आठ धावांवर खेळत होते. सलामीचा शिखर धवन अगदी स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर भारताच्या डावात ठराविक अंतराने विकेट पडत राहिल्या.

विराट कोहलीने चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारीच्या साथीने भागीदारी रचून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण बेन स्टोक्सने विराटला माघारी धाडून इंग्लंडला मोठं यश मिळवून दिलं. विराटचं अर्धशतक एका धावेने हुकलं.

त्याआधी, ओव्हल कसोटीत इंग्लंडच्या शेपटाने टीम इंडियाला चांगलाच तडाखा दिला. जॉस बटलर आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी आठव्या विकेटसाठी रचलेल्या 98 धावांच्या भागीदारीने या कसोटीत इंग्लंडला संकटातून सावरलं, आणि टीम इंडियावरचं टेन्शन आणखी वाढवलं.

इंग्डंलनं आदल्या दिवशीच्या सात बाद 198 धावांवरून सर्व बाद 332 धावांची मजल मारली. जॉस बटलरने आधी आदिल रशिद आणि मग स्टुअर्ट ब्रॉडच्या साथीने इंग्लंडच्या डावाला आकार दिला. बटलरने सहा चौकार आणि दोन षटकारांसह 89 धावांची बहुमोल खेळी उभारली.