पुणे : काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप पुण्यात झाला. समारोपाची सभा सायंकाळी पाच वाजता सुरु होणार होती, मात्र ती सहा वाजता सुरु झाली. ताटकळलेल्या उपस्थितांनी राज्यातील नेत्यांची भाषणं झाल्यानंतर मैदानातून काढता पाय घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं.

काँग्रेस पक्षातील राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भाषणानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचं भाषण सुरू असताना लोक निघून जात असल्याचं पाहायला मिळालं. अनेक खुर्च्या रिकाम्या होत असतानाही आझाद यांचं भाषण सुरू होतं.

कोल्हापुरातून 31 ऑगस्टला सुरु झालेली ही जनसंघर्ष यात्रा सातारा, सांगली, सोलापूर आणि पुढे पुण्यात पोहोचली. पश्चिम महाराष्ट्रातील अखेरच्या टप्प्याची समारोप सभा पुण्यात झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

सनातनच्या जयंत आठवलेंना अटक करा : विखे पाटील

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सनातनशी संबंध आहेत का, यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून करण्यात आली. सनातन संस्थेवर बंदी घाला आणि या संस्थेतील जयंत आठवलेंना अटक करण्यात यावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

अशोक चव्हाणांचा सरकारवर निशाणा

आमच्या मुली, बहिणी सुरक्षित नाहीत. प्रशांत परिचारक यांनी वक्तव्य केलं. त्यानंतर भाजपचे आमदार राम कदम यांनीही आक्षेपार्ह वक्तव्य केलं. सत्तेचा माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. माज उतरवायला सामान्य जनता आहे, असं म्हणत अशोक चव्हाणांनी सरकारवर टीका केली.

100 नगरसेवक, 8 आमदार आणि एक खासदार पुण्यात आहे, पण शहरात खंडणी वसुली होत आहे, मर्सिडीज गाड्या भेट देत आहेत. मर्सिडीज गाडी खंडणी म्हणून वापरली जाते. पुणे सांस्कृतिक राजधानी होती, आता टोळीयुद्ध होत आहे, असा गंभीर आरोप अशोक चव्हाणांनी केला.

आधी आम्हाला विचारायचे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा.. फडणवीस साहेब 'खड्ड्यात नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा'. 10 तारखेला देशात बंद आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. त्याविरोधात हा भारत बंद असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

दरम्यान, भाजप आमदारांच्या वक्तव्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एक शब्द काढला नाही, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाणांनी फडणवीसांवर निशाणा साधला. शिवाय भाजप महिला आमदारांना विचारतो, तुम्ही तुमच्या मतदारसंघात राम कदम यांना समर्थन करणार आहेत का? असा सवालही त्यांनी केला.