मॅन्चेस्टर : तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 2-1 ने पराभूत करत विजय साजरा केला आहे. कोरोनानंतर सुरु झालेल्या क्रिकेट सामन्यांमध्ये इंग्लंडने आधी वेस्ट इंडिज, मग आयर्लंड आणि त्यानंतर पाकिस्तान यांच्याशी झालेल्या क्रिकेट मालिकांमध्ये विजय मिळवला होता. मात्र इंग्लंडच्या विजयाची ही मालिका ऑस्ट्रेलियानं खंडित केली. मॅक्सवेलच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियानं हा विजय मिळवला.


तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पहिल्या दोन चेंडूत जेसन रॉय आणि कर्णधार जो रूट यांच्या विकेट्स गमानल्या. त्यानंतर जॉनी बेअरस्टोने एकहाती खिंड लढवली. त्याने 126 चेंडूत 112 धावा केल्या. त्यात 12 चौकार आणि 2 षटकार लगावले. बेअरस्टो बाद झाल्यावर खालच्या फळीतील सॅम बिलिंग्स (57) आणि ख्रिस वोक्स (नाबाद 53) यांनी दमदार फलंदाजी करत संघाला तीनशे पार पोहोचवले.


इंग्लंडने दिलेलं हे 303 धावांचं आव्हान पार करताना ऑस्ट्रेलियाची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. ठराविक अंतराने गडी बाद होत राहिल्याने त्यांची अवस्था 5 बाद 73 अशी झाली होती. पण त्यानंतर अॅलेक्स कॅरी आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांनी 212 धावांची भागीदारी केली. दोघांनाही दमदार शतकं झळकावली. कॅरीने 7 चौकार व 2 षटकारांसह 106धावा केल्या, तर मॅक्सवेलने 7 चौकार आणि 7 षटकारांसह 108 धावा करत संघाला मालिका विजय मिळवून दिला.