दुबई : इंग्लंड आणि पाकिस्तानच्या शारीरिकदृष्ट्या दिव्यांग क्रीडापटूंच्या क्रिकेट सामन्या दरम्यान एक वेगळीच घटना घडली. टी-20 सामना सुरु असताना इंग्लंडचा फील्डर लियाम थॉमसचा कृत्रिम पाय निखळला.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात लियाम थॉमस फिल्डिंग करत होता. त्याचवेळी फलंदाजाने टोलवलेला चेंडू त्याच्या दिशेने आला. बाऊंड्रीच्या दिशेने झेपावणारा चेंडू थांबवण्यासाठी लियाम वेगाने धावला. त्याचवेळी त्याचा कृत्रिम डावा पाय निखळला.
विशेष म्हणजे, त्याही परिस्थितीत त्याने चेंडू उचलून थ्रो केला. त्यानंतर पडलेला कृत्रिम त्याने पुन्हा लावला आणि तात्काळ फील्डिंग सुरु केली.
थॉमसची जबरदस्त फिल्डिंग मात्र निष्फळ गेली. पाकिस्तानने हा सामना खिशात घालत इंग्लंडवर मात केली. मधल्या फळीतील फलंदाज लवकर तंबूत परतल्याने इंग्लंडला पराभवाचा धक्का सहन करावा लागल्याची कबुली कर्णधार इयान नायरेनने दिली.